Skip to main content

धर्मासाठी

धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. आपण 'एखाद्या' धर्माबद्दल बोलत असू तर तो 'विशिष्ट' प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग असतो. धर्म ही संकल्पना फार पूर्वी उदयास आली पण त्या संकल्पनेला नाव मिळालं नव्हतं. आपल्या पूर्वजांपासून जे काही कार्य, व्यापार, संस्कृती, कला किंवा कसलाही व्यवहार चालत आलेला असतो, तो पुढची पिढी चालवत असते, त्यालाच ते आपला धर्म मानतात. आणि त्यानुसारच ते आपलं आयुष्य चालवतात.
इतिहास पाहिला, तर पूर्वी लोक भटके होते. ते खाण्यापिण्यासाठी ठिकठिकाणी फिरत होते. समाज फार विचलित होता. ही परिस्थिती पाहून काही विद्वान लोकांना असं वाटलं की समाजाला काहीतरी चांगली शिकवण द्यावी जेणेकरून सर्वांना सुख-शांती लाभेल. असे अनेक संत, विचारवंत, तत्वज्ञानी जन्मास आले. काही महत्वाच्या महान लोकांचा इथे उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे चक्रधर स्वामी, बसवेश्वर महाराज, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर जैन, मोहम्मद पैगंबर; या सर्व लोकांनी समाजाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना फक्त चांगले उपदेश दिले, ते काही "आज एक नवीन धर्म सुरु करुया" या उद्देशाने घरातून नाही निघाले. त्यांना फक्त लोकांना जीवनाचं सत्य सांगून, भेदाभेद मिटवून सुखी करायचं होतं.
आज "धर्म" या संकल्पनेची व्याख्याच बदलली आहे. २१व्य शतकात लोक चक्क धर्मासाठी लढतात, दहशत पसरवतात. जग इस्लामी करण्यासाठी अल कायदा, तालिबान, लष्कर-ए-तोयबा; हिंदू धर्म वाढवण्यासाठी आर.एस.एस., बजरंग दल, रणवीर सेना; शीख धर्माच्या बब्बर खालसा, खलिस्तान कमांडो फोर्स, इंटरनेंशनल सीख युथ फेडरेशन सारख्या संघटना कार्यरत आहेत. ह्या सर्व संघटनांकडून आपापला धर्म प्रसारीत करण्यासाठी जगात दहशत माजवली जात आहे. ह्या मूर्खांना हे सुद्धा माहित नाही की धर्म कशासाठी असतो आणि त्याच्या संस्थापकांनी तो का स्थापन केला? कोणताही धर्म मुळात समाज कल्याणाचाच संदेश देतो आणि त्याच धर्मासाठी लोक आज जे नाही ते करत आहेत. जर का जग इस्लामी होत नसेल तर इतर धर्मियांना मारा आणि जगात फक्त मुसलमान ठेवा; भारतात हिंदू मुसलमानांचा द्वेष करतात. याच मानसिकतेने आपण आयुष्यभर जगणार आहोत का? आपण हे का समजून घेत नाही की, जो धर्म ज्याला पटेल तो तो स्वीकारेल.
भारतामध्ये हिंदू धर्मीय देवाच्या नावाने अनेक अंधश्रद्धेचे बळी होतात. पूर्वी धर्माच्या नावावर वर्णव्यवस्था रूढ होती. लोक धर्माने सांगितल्यामुळे मानवतेच्या विरोधात असणाऱ्या गोष्टी स्वीकारू लागले. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक फार महत्वाचं वाक्य म्हणाले, "Religion is for man, Man is not for Religion." म्हणजे धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. ही गोष्ट हजारो वर्ष लोकांच्या लक्षात नाही आली. पुढे बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला पण त्यात त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या. ते शक्य झालं कारण बौद्ध धम्म अतिशय फ्लेग्झीबल आहे, तो काळानुसार लोकांसाठी बदलू शकतो. म्हणून आंबेडकरांनी बौध्द धम्म एक धर्म म्हणून नाही तर तत्वज्ञान म्हणून स्वीकारला ज्याचा विज्ञानाशी घनिष्ट संबंध आहे आणि तो मानवाच्या जगण्यासाठी उपयुक्त आहे. अशीच लवचिक वृत्ती आपली पाहिजे. सनातन राहून काही फायदा तर होत नाही, पण नुकसान मात्र होतं.
आज धर्म म्हटलं, की लोकं आपले कान टवकारतात. त्यांच्या धर्माच्या एखाद्या व्यक्तीबद्दल काही चुकीच्या गोष्टी समोर आल्या की ते मान्य करत नाहीत, तर उलट त्यांची बाजू घेऊन अजून पेटून उठतात, मग जरी ते चुकीचे असले तरी आणि त्यांना त्याची जाणीव झाली असली तरी. ते विचार करत नाहीत, की सर्व मानावांकडून चुका ह्या होतच असतात, मग जी गोष्ट चुकली ती मान्य केली पाहिजे. पण असं नाही होत कारण जन्मतःच बालकांना त्याप्रकारची शिकवण दिली जाते की जेणेकरून ते कट्टर होतील. आपण महावीर, बुद्ध, मोहम्मद, फुले, शिवाजी, शाहू, आंबेडकर, मार्क्स, गांधी, टिळक, सावरकर, ई. लोकांना मानत असू; पण मग याचा अर्थ असा होतो का, की त्यांच्याकडून काही चुका झाल्याच नाहीत ! हे असं होतं कारण, ह्या सर्व लोकांना त्यांच्या विचार आणि तत्वांपासून आपणच दूर करून धर्माच्या चौकटीत कोंडून ठेवलं आहे, आणि ती चौकट 'आजच्या धर्माच्या संकल्पेची' आहे.
आपण कोणाला मानलं पाहिजे हे जाती धर्माच्या चष्म्यातून न पाहता स्वतःजवळ असलेल्या बुद्धीने पारखलं पाहिजे. तो अभ्यास करताना सुद्धा स्वतःचे वयक्तिक मत बाजूला ठेवले पाहिजे. आणि जर हे करू शकला नाहीत, तर आपल्या बुद्धीला कीड लागली आहे, किमान याची तरी जाणीव व्हायला हवी. मला या समाजात चांगलं जगायचं आहे, यासाठी मी माझा जात धर्म घेऊन नाही बसलो; मला ज्याचे विचार पटतात ते मी स्वीकारतो. मग ते विचार पैगंबराचे असोत, ख्रिस्ताचे असोत, बुद्धाचे असोत, महावीराचे असोत किंवा इतर कोणाचे असोत, जे पटलं ते स्वीकारायचं.
आज आपण समाजात जो भेदभाव बघतो, तो याच प्रकारच्या मानसिकतेमुळे होतो आणि म्हणून लोक विभक्त झाले आहेत. सर्वांनी जर एक होऊन, "माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे" या तत्वाने चालले तर सर्व जग किती सुखी होईल, याचा आपण विचार करू शकतो.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…