Skip to main content

Posts

Showing posts from December, 2013

सर्व "...एत्तरांसाठी"

चावदारच्या लढ्यात पुढारी
फक्त भीम होता,
अस्पृश्यांना पाण्याचा स्पर्श देणारा
फक्त भीम होता,
फिरलात मागे पाणी पिऊन चवदारचे...
तुमच्या जगण्याच्या मागचं कारण
माझा भीम होता...

मंदिरात बंड करणारा
फक्त भीम होता,
काळ्या रामाला हादरवणारा
फक्त भीम होता,
देवळात जाऊन दगडासमोर नवस फेडणाऱ्यांनो
तुम्हालाच देवळात प्रवेश मिळवून देणारा
माझा भीम होता...

बुद्ध कबीर फुले यांना गुरु मानणारा
फक्त भीम होता,
त्यांचं तत्त्वज्ञान लोकांना सांगणारा
फक्त भीम होता,
आरक्षणाला नाव ठेवणार्यांनो ऐका...
तुमच्या शिक्षणाच्या हक्कामागे झटणारा
माझा भीम होता...

या देशातून जातीची घाण काढणारा
फक्त भीम होता,
तुम्हाला जनावरातून माणसात आणणारा
फक्त भीम होता,
खुशाल सोडून जा तुम्ही ६ डिसेंबर ला ही मुंबई...
तुमच्याच ह्या स्वातंत्र्याला संविधानात लिहिणारा
माझा भीम होता...

- आशित साबळे