Skip to main content

जीवघेणी दही हंडी

"दही हंडी" या सणात काय असं वैशिष्ट्य आहे की ज्यावर आज लाखो - करोडो रुपयांच्या स्पर्धा ठेवल्या जातात. ह्या सणाची सुरुवात हिंदू धर्मात मानल्या जाणाऱ्या भगवान श्री कृष्णापासून झाली. कृष्णाला लहानपणापासूनच दही - लोणी वगैरे खायला खूप आवडत होतं. घरी सारखं तो ते खाण्यासाठी हट्ट करायचा, बऱ्याचदा न सांगता ते खायचा आणि सांडवतही होता. म्हणून आई दही, ताक, लोणी यासारख्या गोष्टी त्याचापासून दूर ठेवायची जेणेकरून त्याचा हात तिथपर्यंत पोहचू नये. मग कृष्ण ते मिळवण्यासाठी पाय उंचावून, कशाकशावर उभा राहून प्रयत्न करायचा आणि ते मिळवायचा. तुम्ही यापुढची गोष्ट समजून घेण्यास सुज्ञ आहात हे समजून मी पुढे बोलतो...
अशी इथून ही सुरु झालेली दही हंडी आज कोणत्या "थराला" पोहोचली आहे ! ही सुरुवातच किती क्षुल्लक गोष्टीपासून झाली हे आपल्या लक्षात येते. आज हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी मंडळ स्थापन करून तालिमी सुरु केल्या ! कशासाठी हे सगळं? जो खेळ क्षणात जीव घेऊ शकतो, हे माहित असतानासुद्धा पालक आपल्या मुलांना पाठवतात, याचं मला फार आश्चर्य वाटतं. बरं "कळतं पण वळत नाही" अशी गत असेल तर आपण वर्तमानपत्र वाचू शकतो की, किती जण जखमी होतात, आजीवन अधू होतात, एवढंच नाही तर मरणही पावतात. तरी दरवर्षी हेच सर्व तेवढ्याच संख्येने सुरु असतं.
जनकल्याणासाठी कार्य करू इच्छिणारे राजकीय पक्ष व नेते ह्याच जीवघेण्या सणात स्वतःच्या पक्षाची जाहिरात करत स्पर्धा आयोजित करतात. माझं वयक्तिक मत असं आहे की, याला बढावा देण्यासाठी जबाबदार आपला मिडिया आहे. ज्याप्रकारे ते अशा बातम्या दाखवतात, त्याने ह्या लोकांना अधिक प्रोत्साहन मिळतं.
याची दुसरी बाजू अशी की, हंडी फोडायला जाणारे पथक मोठ्या संख्येने एकत्र असल्यामुळे त्यांना माज येतो आणि अहंकाराने ते सर्वसामान्य लोकांना आवाज करून, चिडवून, त्रास देऊन मजा घेतात. एवढंच नाही तर मुलींनाही छेडतात. मग इथे प्रश्न येतो तो तुमच्या सणाचा, की तुम्ही तुमच्या 'देवाचा', 'सणाचा', देवाने निर्मिलेल्या 'जगातील मानवाचा' किती आदर करता? आणि असं जर होत असेल तर यातून सरळ-सरळ कळून येतं की, तुम्ही स्वार्थी हेतूने आपले सण साजरे करतात. बरोबरच आहे. ज्याच्यामुळे हा सण सुरु झाला, त्याचाकडूनच तुम्ही प्रेरणा घेणार ना, तो देव(?) तरी कुठे वेगळं काही करत होता.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…