Skip to main content

कसले हे बौद्ध...

 बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? तर प्रतिज्ञेमध्ये नाकारलेल्या गोष्टी नाकारण्यासाठीच, त्याचा विरोध करण्यासाठी नव्हे. मग आपण का पुन्हापुन्हा त्याच गोष्टी उकरून काढत आहोत. एकदा आपण बौद्ध धम्म स्वीकारला की काय करायच्यात पुन्हा आपल्या जुन्या धर्मातील गोष्टी. जर त्या जुन्या गोष्टी सोडून राहवत नसेल तर नका होऊ बौद्ध. मुळात "बौद्ध" या शब्दाचा अर्थ विज्ञाननिष्ट बुद्धीने विचार करणारा, प्रत्येक गोष्टीमागच्या कारणाचा अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार न करता वैज्ञानिक दृष्टीने त्याकडे पाहणारा, स्वतःच्या विकासासाठी दुसऱ्यांना विरोध न करता लढणारा खरा बौद्ध असतो. मग त्याला धम्मदीक्षा घ्यायचीसुद्धा गरज नसते. तो कोणत्याही जाती, धर्म, पंथातला असो, जर तो बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर वागत असला तर तो आपोआपच बौद्ध होतो (जाणीवपूर्वक वागत नसला तरीही). हा "बौद्ध" शब्द फक्त धर्म म्हणून पाहू नका तर त्याचा अर्थ समजून घ्या. त्यासाठी आपल्याला जास्त विचार करायचीसुद्धा गरज नाही, कारण या शब्दातच "बुद्धी" आहे.
 संपूर्ण जगामध्ये ज्या काळात लिखित भाषेचा शोध लागला नव्हता व समाजाला जगण्याच्या दोनच पद्धती माहित होत्या, त्या म्हणजे विलासी थाटात किंवा क्रूर पद्धतीने जगणे, त्याच काळात ज्या बुद्धाने सर्वात प्रथम 'सुवर्ण मध्यमार्ग' समाजाला शिकवला, सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी शोधून काढल्या व त्यावर चिकित्सा करून लोकांना ज्ञान दिलं, त्याच महामानवाच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे पुढील सर्व लोकांनी आपले विचार सांगितले. ते कोणत्याही जाती-धर्माचे असो, पण ते समाजसुधारक विचाराने बौद्धच होते. परत इथे आपण समजू शकतो की, बौद्ध म्हणजे "सिद्धार्थ गौतम" या नावाच्या बुद्धाची उपासना करणे नव्हे, तर त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर जीवन जगणे, आपल्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी नाकारून सत्याचा स्वीकार करणे, असा बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे बौद्ध.
 या गोष्टींच्या आधारावर आपण भारतीय बौद्ध समाज पाहिला तर, कुठेच या गोष्टी आढळत नाही. उलट धर्मांतर केल्यावरसुद्धा त्यांच्या जातींचं अस्तित्व मिटत नाही. सर्वांचा गैरसमज असा झाला असावा की, आपण फक्त आपला देव बदलला, बाकी सर्व तेच. बुद्धाला व बाबासाहेबांच्या फोटोला हळद-कुंकू, ज्यांना ही गोष्ट माहित पडली की हे चुकीचं आहे त्या लोकांनी आता हळद-कुंकू ऐवजी निळा रंग सुरु केला. हिंदूंमध्ये मंगळसूत्रात काळे मणी असतात, तर आपण पांढरे मणी घालायचे. कित्ती मोठ्ठा मुर्खपणा आहे हा...!!! पण कुठेतरी असं वाटतं की त्यांची काही चूक नाहीये, कारण मुळात इथल्या संस्कृतीने सर्वांच्याच डोक्यात धर्माची संकल्पनाच अशा पद्धतीची रुजवून ठेवली आहे की ती पुसून काढणं फार कठीण आहे. धर्म बदलला की मूर्त गोष्टी वेगळ्या पण भावना त्याच राहतात.
 रुढी-परंपरेमुळे ज्या गोष्टी बदलत नाहीत त्या एका "देव नाकारणाऱ्या" धम्मात गेल्यानंतर बदलण्याचा विचार करणे हे आपलं काम आहे. परमेश्वर, सण-उत्सव, कुलदैवत, इत्यादी गोष्टी मानणे आपण चालूच ठेवतो. पितृश्राद्ध पक्षात चांगल्या गोष्टी करण्यास थांबविणे. लक्ष्मीपूजन करणे. काय करायच्यात ह्या गोष्टी? तरी लोक हे सर्व कार्य करतात ते ईश्वराच्या भीतीमुळे. या सर्व गोष्टींचा विचार करून किती आणि कायकाय सांगावं हा मोठा प्रश्न उभा राहतो. माझ्या स्वतःच्या घरात मी सांगून सांगून थकलो, माझ्या आईमध्ये सुरुवातीपासूनच माझ्यासारखे विचार आहेत पण त्याच बरोबर तिच्या मनावर जुन्या रुढीपरंपरेचाही पगडा आहे, पण माझ्या सांगण्यामुळे परिवर्तन जाणवत आहे. मी आणलेली काही पुस्तके ती पण वाचते. या गोष्टीचा आनंद आहे, पण माझे वडील अपरिवर्तनशील आहेत. ज्या प्रमाणावर मी सांगितल्यामुळे माझ्या आईमध्ये परिवर्तन जाणवलं पण वडील मात्र त्यांच्याच जुन्या विचारांवर ठाम आहेत. वरील लिहिलेल्या ज्या गोष्टींना मी मान्यता देत नाही, त्याच गोष्टी माझे वडील वारंवार करतात. अशा वेळी मला असं वाटतं की मी खूप कठीण विचारांना झुंज देत आहे...
 अंधश्रद्धेने ग्रासलेल्या लोकांनी धर्म बदलू द्या, देव बदलू द्या, नाहीतर काहीही करू द्या, त्यांच्यातली अंधश्रद्धा काढणं फार कठीण आहे. नवबौद्धांमध्येसुद्धा या गोष्टी सर्रास चालताना दिसतात, साप चावला की मांत्रिक आठवतो पण डॉक्टर नाही. एखादा प्राणी आपल्याकडून चुकून मेला, तर पाप जाणवतं पण त्याचं दुःख नाही. असे बौद्ध असूच शकत नाही. परत सांगू इच्छितो की बुद्ध, बौद्ध, प्रबुद्ध, सम्यक, ई. हे शब्द धार्मिक नाही तर त्यामागे त्याचा एक मोठा अर्थ आहे, जो तुम्हाला या लेखातून जाणवला असेल अशी आशा आहे.

धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ