पती कसा असावा? या विषयावर तर मी नक्कीच बोलणार नाहीये. कारण हा मुद्दा फार नंतर उदयास आला. हे का निर्माण झालं असावं? यावर मी "माझे विचार" मांडणार आहे... इतिहासापेक्षा आपण आजचेच संदर्भ पाहू, तुमच्या लगेच लक्षात येईल, की पती ही संकल्पना निर्माण होताना नक्की काय झालं असावं. पती म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव गोष्टीचा मालक. आज आपण लखपती म्हणतो तो असतो लाखो रुपयांचा मालक, करोडपती म्हणतो तो असतो करोडो रुपयांचा मालक, तसंच आपण फक्त "पती" म्हणतो तो असतो एखाद्या स्त्रीचा मालक. आता आपण जातो ते इतिहासातील स्त्रीदास्य, गुलामगिरी, अतिशूद्र ह्या गोष्टींकडे. बुद्ध काळापूर्वी स्त्रीसत्ता / मातृसत्ता होती, त्याच दरम्यान गणकाळ आला. त्याच्या काही काळानंतर आर्य भारतात आले. त्या आर्यांनी भारतातील लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी एक विशिष्ट वर्ग निर्माण केला, तो होता ब्राह्मण वर्ग. (इथे आजची ब्राह्मण जात समजू नये, तर ब्राह्मण या 'शब्दाचा अर्थ' मला अभिप्रेत आहे.) त्या ब्राह्मण वर्गाने इथल्या मूळच्या लोकांना मुर्ख बनवून त्यांच्यावर शासन करण्यासाठी वेद, पुरण, वेदांत, आरण्यके, उपनिषद,...