Skip to main content

"महामानव" : हे विशिष्ट जातीचे/धर्माचे नाही तर संपूर्ण समाजाचे असतात.

 आजच्या काळात आपल्या समाजामध्ये "जमातवादी राजकारण" खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या महामानवांचे नाव घेऊन व लोकांचा वापर करून आपला स्वार्थ साधत आहेत. अज्ञानी लोक त्यांच्या दिखाऊ भूमिकेच्या आहारी जाऊन बळी पडतात आणि आतलं "राजकारण" समजूनच घेत नाहीत. आजपर्यंत जेवढ्या पण (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) राजकीय पक्षांमुळे दंगली झाल्या, त्यामध्ये वरच्या लोकांना काही फरक पडला नाही, तर त्यात बळी पडला तो सर्वसामान्य समाजच.
 
 आज आपण पाहू शकतो की शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर काही महापुरुषांचं नाव घेऊन किती चुकीचे काम चालतात.

  शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू धर्म, हिंदुत्व, हिंदुत्ववाद वाढवणे आणि मुसलमानांचा द्वेष करणे अशा गोष्टी दिसतात. बोलतात शिवाजी महाराज हे "हिंदवी स्वराज्य" संस्थापक आहेत. महाराजांनी कधीच कोणाचाच जात-धर्म पाहिला नाही. ते फक्त स्वराज्यासाठी लढले. तो काळ पाहिला तर त्यावेळी लोक फक्त आपले राज्य वाढवण्यासाठी लढायचे, शिवाजी महाराजांनी आपल्या हक्काचे, रयतेचे राज्य जिंकले, हिंदू "धर्माचे" नाही. आताच्या नकली इतिहासकारांनी असा तर्क लावला की 'महाराज हिंदू होते म्हणून ते धर्मासाठी लढले आणि मुसलमानांच्या कैदेतून राज्य मिळवलं म्हणून ते हिंदवी स्वराज्य झालं.' खरं म्हणजे तिथले बहुसंख्य लोक हिंदू असतील म्हणून ते हिंदवी स्वराज्य म्हणत असतील. पण मग यावरून हे सिद्ध होतं का? की महाराज हिंदवी स्वराज्यासाठी लढले. जर ते हिंदुत्ववादी असते तर त्यांनी आपल्या राज्यात मुसलमानांना आणि खालच्या स्तरातल्या जातीच्या लोकांना थारा दिला नसता.
 छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी राज्याभिषेकासाठी विरोध केला. मग कसंबसं काशी वरून गागाभट्टला आणला. आणि आता पॉलिसी मारून "गो ब्राह्मण प्रतिपालक" अशी पदवी महाराजांना लावली जाते, जी की चुकीची आहे हे सरळ सरळ दिसून येतं. त्या वाक्याचा अर्थ पाहिला तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की, ते जर "गो ब्राह्मण प्रतिपालक" आहेत, तर त्यांच्या राज्यात किती गोठे होते? त्यांनी किती गायी पाळल्या होत्या? त्यांच्या राज्यात दुधाचा व्यवसाय कसा होता?  बरं मग ते "गो ब्राह्मण प्रतिपालक" होते तर त्यांना राज्याभिषेकासाठी विरोध का झाला? त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीसारख्या ब्राह्मणाला मारलं हे लोकांच्या लक्षात नाही वाटतं! मग जर ते फक्त ब्राह्मणांचे पालक असते, तर आज इतर जातीच्या लोकांनी त्यांचं नावही घेतलं नसतं. आज त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ते सगळं करत बसायला महाराजांना वेळच नव्हता, हे आपल्या सर्वांना माहित आहे, तरी पण काही लोक कोणत्याही भाकड गोष्टींवर विश्वास ठेवतात.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असं म्हणावं लागेल की, विशिष्ट जातीच्या लोकांनीच बाबासाहेबांना जातीच्या चौकटीत ठेवलं आहे. "आमचे बाबासाहेब" हे वाक्य सतत ऐकू येत असतं, आणि मग इतरही "तुमचे लोक" असे शब्द वापरू लागले. याने समाजात एक दरी निर्माण झाली आणि बाबासाहेबांनी ह्या देशासाठी जे काही केलं, ते सगळे जवळपास विसरून गेल्या सारखंच आज वातावरण दिसतं, आणि माझ्या मते त्याला कारणीभूत आपली मिडियासुद्धा आहे. ज्या वेळी दूरदर्शन या वाहिनी वर सतत व वारंवार मोहनदास गांधी आणि इतर कॉंग्रेसच्या लोकांचे माहितीपट दाखवले जातात, त्यावेळी त्यांच्या लक्षात देशातले इतर महापुरुष येत नाहीत. काय फक्त गांधी कुटुंबानेच ह्या देशासाठी लढा दिला? दुसरे कोणी नव्हते का? सगळ्या सरकारी योजना ही त्यांचाच नावावर!
 अशा वेळी मला लगेच आठवतात "स्वतंत्र भारतीय संविधानाचे शिल्पकार. विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर."  जे एका अस्पृश्य समाजात जन्म घेऊन शाळेच्या बाहेर बसून शिकले आणि या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांनी 'दीन-दलित, अस्पृश्य, बहिष्कृत, गोर-गरीब' या नावांच्या परिस्थितींचा अभ्यास केला आणि हिंदू धर्मात ही वर्णव्यवस्थेची उतरंड दिसली. त्यांनी जवळपास ३० वर्षे हिंदू धर्म सुधारेल याची वाट पहिली आणि शेवटी बौद्ध धम्मात धर्मांतर करायची घोषणा केली व जातींच्या बंधनातून समाजाला मुक्त केलं. आज त्याच तळागाळातले लोक त्यांना "विनाकारण" नावं ठेवतात.
माझा एक अनुभव सांगावसा वाटतो, "एकदा मी माझ्या OBC समाजातल्या मित्राच्या घरी गेलो. डिसेंबर चा महिना होता. मित्राची आई मला म्हणाली, काय रे काही दिवसांनी तुमचे लोक येऊन आमचं शिवाजी पार्क घाण करतील." त्याचं मला ही वाईट वाटतं. पण त्यांचामुळे बाबासाहेबांना व संपूर्ण समाजाला एका तराजूत धरणे हे चुकीचं आहे. (त्यावेळी मी तिला त्यांच्या सगळ्याच सणांचं उत्तर देणार होतो, पण त्यांचा मी आदर ठेवला आणि गप्प राहिलो.)  त्या बाईला याची जाण नाही की, बाबासाहेब जेव्हा भारताचे कायदेमंत्री होते, तेव्हा त्यांनी Other Backward Class मध्ये कोणत्या जाती टाकायच्या याविषयी मंडल आयोग स्थापन केलं. इतर मागासवर्गीय जातींची यादीसकट माहिती काढण्यात आली. त्यांना विशेष सवलत व आरक्षण मिळावं यासाठी बाबासाहेबांनी सरकारकडे मागणी केली, हिंदू कोड बिल तयार केलं आणि ते कॉंग्रेसने नाकारलं. त्यामुळे लगेच बाबासाहेबांनी 'माझ्या समाजबांधवांचा विचार केला नाही' म्हणून सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकला. [ही गोष्ट कोणाला माहित नसेल पण एका OBC अध्यक्षाला माहित आहे, जे काही दिवसात स्वतःसोबत असणाऱ्या समाजाला घेऊन हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारणार आहेत. (त्या व्यक्तीचं नाव व पक्ष सांगणार नाही.)]

  असो बाबासाहेब मराठा जातीसाठीसुद्धा लढले, आंदोलने झाली. आंबेडकरांचे विविध समाजांशी एवढे चांगले संबंध होते की, मराठा समाजातील काही लोक "मराठवाडा विद्यापीठाचे नाव तुमच्या नावावरून ठेवू का..." असे विचारत आंबेडकरांकडे गेले, त्यावर बाबासाहेब म्हणाले "मी जिवंत असताना माझे मढे नका बांधू." त्यावेळी मराठवाड्यातील लोकांची इच्छा होती की विद्यापीठाला त्यांचंच नाव लाभावं. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि बऱ्याच संघर्षानंतर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे नामकरण करण्यात आलं.
  हिंदू कोड बिल पास होण्यासाठी जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती, पण त्यांना कॉंग्रेसच्या इतर लोकांनी भडकवलं आणि त्या बिल मधले काही मुद्दे गाळून, फक्त काही मुद्द्यांनाच मान्यता दिली गेली. आणि आज लोकांसमोर एवढा भ्रष्टाचार होत असतांनासुद्धा लोक कॉंग्रेसमध्ये जातात.

 महात्मा जोतीबा फुले, एक धाडसी व्यक्तिमत्व. त्यांनी त्या काळात वर्ण व जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभा केला. ब्राह्मण्यवादाच्या समोर उभा टाकलेला तो अठराशेच्या शतकातला एकमेव महामानव. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध व महात्मा फुले यांनाच आपले गुरु मानले. जोतीबा फुलेंना त्यांच्या एका ब्राह्मण मित्राने त्याच्या लग्नाला बोलावलं आणि तिथे पोहोचल्यावर नवरदेवाच्या ब्राह्मण नातेवाईकांनी त्यांना लग्नातून बाहेर काढलं. असा जातीभेद पाहिल्यावर त्यांनी जातींच्या उतरंडीविरोधात बंड पुकारला. त्यांनी शूद्रांच्या मुलांना आणि समाजातील सर्व महिलांना अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण दिले. सावित्रीबाई फुलेंनी फार हालअपेष्टा सहन करून त्यांना महिलांच्या शिक्षणासाठी जीवापाड मदत केली.
 फुलेंचं खरं नाव "जोतीराव गोविंदराव गोऱ्हे". त्यांच्या फुलांच्या व्यवसायामुळे ते फुले म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी काय केलं? हेच लोकांना माहित नाही. म्हणून लोक तर्क लावतात की, ते दुसऱ्या समाजाचे, आपलं त्यांचं काही घेणंदेणं नाही. ह्याच गोष्टीची खंत वाटते, की मनुवादी लोकांनी अशा महामानवांना सर्वसामन्यांपर्यंत पोहचूच दिलं नाही... म्हणून आपल्याला अभ्यासाची गरज आहे.

 असे बरेच ज्ञात - अज्ञात महापुरुष आहेत. ते संपूर्ण मानव जातीसाठी लढले. मानवाने निर्माण केलेल्या जातींसाठी नव्हे. याची आपल्याला जाण असायला हवी. नसेल, तर याने आपला, त्यांचा आणि सोबतच भारताचा ही अपमान आहे.

 याचाहून  खूप काही अधिक सांगायचं आहे... लवकरच त्यावर लिहीन...

धन्यवाद!

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…