Skip to main content

31st नाईट : ती रात्र

 कालची संध्याकाळ काही वेगळीच होती. खूप काही नवीन अनुभवलं. आमच्या एका मिडियाच्या सरांनी (सांध्य यांनी) एक नाटक लिहिलं. त्या एकांकिकेमध्ये त्यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोघांचं संभाषण व्यक्त केलेलं आहे. पण व्यक्ती जाणवतात मात्र अनेक. विषय थेट मनाला भिडतो, हृदयाला स्पर्श करतो, अंगावर शहारे आणतो. या जगातील लोकांची मानसिकता काय आहे? याची जाणीव करून देतो.
 पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो याचे चित्रण "सांध्य" यांनी केलंय. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्ष सुरु होताना ती "फॉरवर्ड युवा पिढी" काय करते... बारमध्ये दारू पिणं, रेव पार्टी, ड्रग्स घेणं, नशा करणं, सेक्स करणं या गोष्टी त्या दिवशी सर्रास होत असतात. माणसाचं मन संकुचित असतं, मानसिकता तयार झालेली नसते (किंवा "त्या" प्रकारची मानसिकता तयार झालेली असते), पाश्चिमात्य संस्कृती चुकीच्या प्रकारे आपल्या जीवनात आणणे, याच गोष्टी त्याच्या डोक्यात कायम फिरत असतात. आजच्या बऱ्याच मुलांचा/पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे "डोळ्याने बलात्कार करणे" असाच आहे. दृष्टीकोन न बोलता मी कृती म्हणालो तर "डोळ्याने" हा शब्दच नको.
 अशाच एका मानसिकतेचा मुलगा त्या पार्टीमधून बाहेर येऊन एका मुलीला हातवारे करत बोलताना पाहतो. मुलगी समुद्राकडे पाहून एकटीच बडबडत असताना पाहून त्याला प्रश्न पडतो आणि शेवटी तो तिला जाऊन भेटतो. मुलगी सुरुवातीला त्याचावर वैतागते. त्यांची ओळख नसतानाही तो मुलगा तिच्याकडे "त्या" हेतूनेच जातो. त्यांचे एकमेकांना प्रश्न, त्यांचं बोलणं सुरु होतं. त्यापुढे सुरु होतो तो एक अविस्मरणीय प्रवास. ती मुलगी त्याला ओळखते की तो कोणत्य हेतूने तिच्याकडे आलाय... पण तिचं जगच मात्र वेगळं होतं. त्यांचं बोलणं सुरु असताना ती त्याला दुःख म्हणजे काय ते सांगते, खऱ्या प्रेमाची भाषा सांगते. प्रणय, वासना, संभोग अशा गोष्टींवर ती बोलते, त्याच्याही डोक्यात तेच असतं पण त्याला ते सहन होणारं नव्हतं, कारण तो ज्या चष्म्यातून ते विषय पाहत होता, ते काही वेगळंच होतं. ते सर्व ऐकून त्याची दारू उतरते पण वासना मात्र उतरत नाही. ती त्याला तिच्या प्रेमाची व त्या नंतरची कहाणी सांगते, मुलगा अचंबित होतो. त्याला काही कळेनासं होतं. तिची कहाणी मात्र त्याच्या मेंदूवर काम करते, पण त्याला कळूनही वळत नव्हतं. बेशुद्ध होऊन समुद्रकिनारी पडलेला मुलगा पाहून लोक जमतात. त्या लोकांचाही तोच दृष्टीकोन! जाग आल्यावर तो त्याच मुलीला शोधण्यासाठी सैराभैरा धाऊ लागतो...
 या अशा विचारांवर चालणाऱ्या लोकांसाठी त्यांचाच विचारांवर आधारित हा विषय पाहणं महत्वाचं वाटतं.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …
सहन करू नका, विद्रोह करा.
डरपोक राहू नका, बंडखोर बना.
 - आशित साबळे

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …