Skip to main content

गणेशोत्सव

काय हिंदू धर्मीय खरंच गणेशोत्सव एक "धार्मिक" सण म्हणून साजरा करतात का?

 बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय की गणेशोत्सव आला की लोक खुश होतात, पण त्यांचं खुश होण्याचं कारण नक्की काय याचं उत्तर आता दिसू लागलं आहे. मी समस्त हिंदू समाजाबद्दल बोलत नाहीये; पण काल घरी येताना बरेच मंडळी गणेश विसर्जनासाठी जाताना दिसले. गणपती मागे आणि पुढे "चिकनी चमेली" आणि "हलकट जवानी" सारख्या गाण्यांवर "बाप्पाचे भक्त" नाचत होते. त्या लोकांच्या गर्दीत काही जण कोल्डड्रिंकमध्ये दारू मिसळून बारी बारीने पित होते. विसर्जन करून आल्यावर सगळीच मुले रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर त्यांच्या नकळत गुलाल उधळत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या माणसांबद्दल तर सांगायलाच नको.
 सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करताना टिळकांनी सांगितलं होतं का की, गणपतीच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी बॅंडबाजा, फटाके हे अपरिहार्य आहेत. काही वर्षांपूर्वी एका गावामध्ये जल्लोषात गणपतीला घेऊन चालले होते. त्यावेळी एकाने अगदी रस्त्याच्या मधोमध 'रस्सी बॉम्ब' लावला आणि गाड्यांना थांबवलंसुद्धा नाही. त्यावरून एक रिक्षा जात असतानाच तो बॉम्ब फुटला आणि मग रिक्षाही फुटली. चालक व प्रवासी दोघे गंभीर जखमी झाले. पुढे त्यांचं काय झालं ते मला माहित नाही, पण ही गोष्ट काय साधारण नाही ना!
 काही वर्षांपूर्वी तर गणपती बाप्पाच्य अति श्रद्धाळू भक्तांनी तर माणुसकीची हद्दच पर केली. सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या "लालबागचा राजा"च्या दर्शनाला लोकांची दरवर्षी प्रचंड गर्दी होते. त्याच गर्दीत एक म्हातारी होती. पण त्या ठिकाणी गेल्यावर लोकांचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे आत जाऊन दर्शन घेणे; मग कोणाचं काहीही होवो. ती म्हातारी बाई रांगेत असताना, लवकर दर्शन घेण्यासाठी मागच्या लोकांनी तिला ढकलून बाजूला केलं आणि ती एका खांबाला जाऊन धडकली. तो खांब तिच्या छातीच्या मध्यभागी घुसत होता. गर्दीमुळे हलता ही येत नसल्याने काही मिनिटे तिला तसच वेदना सहन करत उभं राहावं लागलं. त्या दरम्यान तिच्या जवळ असणाऱ्या एकालाही तिला बाजूला करण्याचं सुचला नाही. माझा एक मित्र तिथे ड्यूटीवर होता, कसाबसा तो त्या म्हातारीपर्यंत पोहोचला आणि सर्वांना बाजूला ढकलून त्याने त्या बाईला बाजूला काढलं. वयोमानानुसार पाहिलं तर त्या म्हाताऱ्या बाईला किती त्रास झाला असेल. म्हणे चालले गणपतीच्या दर्शनाला...
 रस्त्यावर सार्वजनिक गणपती बसवण्यासाठी मंडळाने ऐपत आहे तेवढाच खर्च करणं अपेक्षित असतो, पण अधिक देखावा करण्यासाठी चक्क "स्पॉनसर्स"! तुम्हाला लोकांपर्यंत "देव" पोहोचवायचा आहे की डेकोरेशन? धर्माचं बाजारीकरण याला म्हणतात...

धर्म हवा आहे की देव?

 मला असा प्रश्न पडतो की बाळगंगाधर टिळकांनी जेव्हा "सार्वजनिक गणेशोत्सव" सुरु केला तेव्हा त्यांनी भविष्यात होणाऱ्या विकृतीकरणाबद्दल विचार केला असेल की नसेल? कारण जेव्हा एखादा महापुरुष समाजासाठी काहीतरी करतो, तेव्हा तो त्या गोष्टीचा सर्व अंगाने विचार करतो. त्यांना आता या घडणाऱ्या गोष्टींबद्दल अंदाज कसा काय आला नाही? असो...
 उत्सव हा समाज एकत्र येण्यासाठी असतो. पण गणपती हा प्रत्येक घरात आल्यामुळे कोणाला दुसऱ्यांच्या घरी जायची गरजच वाटत नाही, किंवा वाटली तरी घरातून स्वतःच्या गणपतीच्या सेवेमुळे वेळ मिळत नाही. मग अशा वेळी प्रश्न येतो तो "समाज एकत्र येण्यासाठी साजरा केला जाणारा धार्मिक सण" याच्या सुरुवातीचा. जेव्हा "परमेश्वर" ही संकल्पना उदयास येत होती, तेव्हा अर्धपशु व अर्धमानव असा देवाचा विचार केला जाऊ लागला; कारण मानव स्वतःसारखा परमेश्वर स्वीकारत नव्हता. काहीतरी मानवाहून वरचढ अशा या कारणाने देव ही संकल्पना सुरु झाली. मग ती देवाची प्रतिमा एका परिवारात स्थापन करून सर्व नेत्यागोत्यातले लोक त्याच्या घरी जमायचे. जसं मी या परिच्छेदाच्या सुरुवातीला म्हणालो की, उत्सव हा समाज एकत्र येण्यासाठी असतो. तसा हा पूर्वीसारखा दिसत नाही. किंबहुना अजून विभक्त होत चालला आहे...
 धर्म आपल्याला आयुष्य जगण्याची पद्धत, विचार, मार्ग सांगतो जेणेकरून जीवन सुखमय व्हावे. रस्त्यावर प्रत्येक गणपती जाताना प्रत्येकाचे ढोल, बॅंडबाजे, आरत्या, ई सर्व वेगळेपणाने व अलिप्त. त्यामधून स्पर्धा सुरु होते, आणि मग त्यातून वैर होते. मग कशाला हवा आहे धर्म? फक्त देवालाच घेऊन बसा घरात...

जगण्यासाठी नैसर्गिक जग हवं आहे की प्रदुषित?

 प्रत्येकाच्या घरात गणपती. प्रत्येक जण विसर्जन करणार. ते सर्व सामावून घेण्यासाठी समुद्र आहे एकच; आणि त्या समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागतात ते ढोल-नगारे, बॅंडबाजा, फटाके; तेही वाजतात एकाच रस्त्यावर प्रत्येकाचे. जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही एवढ्या वाक्यावरून विचार करू शकता. यातून ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, अजून कित्येक प्रकारची हानी आपल्या निसर्गाला होत असते व पुढे ती नकळत आपल्यापर्यंतही पोहोचते.
 सुधरा लोकांनो... धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. प्रत्येकाने गणपतीची प्रतिष्ठापन करण्याऐवजी एकत्रितपणे केली तर धार्मिक कार्यही पूर्ण झाल्यासारखे वाटेल आणि प्रदूषणसुद्धा कामी होईल...

- आशित साबळे.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…