Skip to main content

खरे कलावंत कोण? स्टार की अभिनेते...

 बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि स्टार या शब्दांमध्ये बरीच मोठी तफावत आहे. स्टारला अभिनयाशी काही देणं-घेणं नसतं. ते मुळात श्रीमंत 'चित्रपट कलाकारांच्या' घराण्यात जन्माला येतात म्हणूनच त्यांना जन्मतःच स्टार नावाचा टॅग लागतो. तिथूनच त्यांना बॉलीवूडचा शॉर्टकट मिळतो, मग काय करायचंय अभिनयाशी... चित्रपट मिळतो ना, तोही मुख्य भूमिकेसाठी. मग बस! असाच विचार कदाचित त्यांच्याही मनात येत असेल. पण कोण कशाला बोलून दाखवतंय!
आपण मराठी अभिनेते पहिले, तर जास्तीत जास्त लोक हे चांगल्या दर्जाचे कलाकार आहेत. त्यामागे त्यांची मोठी कहाणी असते. माझा मुद्दा हा नाही की, धडपड केल्यानेच माणूस कलावंत होतो. माझं असं म्हणणं आहे की, त्याच्या "कलाकार" होण्यामागे जे काही असेल ते त्याचं वैयक्तिक आयुष्य. प्रेक्षकांना दिसते ती त्यांची पडद्यावरची कामगिरी. हा विषय लक्षात घेतला तर "स्टार" ही गोष्ट वेगळीच वाटते. रणबीर कपूर, इम्रान खान यांच्यासारख्या स्टार्सचा अभिनय हा बनावटी वाटतो; तर तुषार कपूर, उपेन पटेल हे तर माझ्या मते चुकून अभिनय क्षेत्रात आले असतील, कारण इतरांचा अभिनय हा किमान बनावटी वाटतो पण हे तर अभिनयच करत नाहीत. मग लोकांनी असे नाव ठेवण्यापेक्षा कशाला हवं आहे स्टारडम? पैशांसाठी? जर हे फक्त नाव आणि पैशांसाठी असलं तर याला पुढे वेगळंच वळण प्राप्त होतं. स्टार झाल्यावर लोक पैसे देऊन राजकीय सभेत, आंदोलनात, महागड्या लग्नात, ई ठिकाणी बोलावतात, आणि स्टार ते करतो कारण त्याला हवं असतं ते फक्त नाव आणि पैसा... कित्येक जण असं करतात. बॉलीवूडला पण नाचणारे (नृत्य करू शकणारे), गोरे आणि त्यांच्या हिशोबाने चांगले दिसणारे लोक "अभिनय" करण्यासाठी हवे असतात. हा कुठला न्याय? चांगले-चांगले कलाकार फिल्म्सच्या बाहेर राहून झटत आहेत आणि इथे आवड नसणारे लोकही अभिनयाचा प्रयत्न म्हणून जातात आणि स्टार होतात.
 मराठी चित्रपटसृष्टीत फार मोठमोठे प्रतिभावान कलाकार आहेत, पण परत इथे "मराठी चित्रपटसृष्टी"कडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांचा वेगळा आहे. काहीतरी खालच्या दर्जाचं असं समजतात. पण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, मराठी चित्रपटांमध्ये जेवढे नवनवीन प्रयोग होतात, तेवढे हिंदीमध्ये नाही होत. करोडोंनी पैसा जास्त ओतल्यावर लोकांना भुरळ पडत नसते, त्यांना चांगल्या वाईट गोष्टी कळतात. मी बॉलीवूडच्या विरोधात नाही, किंबहुना मला बॉलीवूड आवडतं. माझा विरोध आहे तो स्टार सिस्टमला. त्यांच्यामुळे चांगले कलाकार दबले जातात.
 पुढे त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी मिडिया काही कमी करत नाही, बातमी मिळत नसेल तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसायचं आणि वृत्तपत्रात छापून आणायचं. एकंदरीत मास मिडियामध्ये हीच पद्धत सुरु असल्याने याला बळकटी आली आहे.
 स्टार लोकांच्या चित्रपटाची "गणितं" ठरलेली असतात. हिट होत नसेल तर तो होण्यासाठी त्या अनुषंगाने वादविवाद सुरु करतात जेणेकरून लोक येणारा चित्रपट बघतील. मात्र मराठीत लोक कोणता चित्रपट पहायचा हे त्यांचे वाद सुरु असले तरी स्वतःच ठरवतात. लोकांना काय करायचेत कोणाचे भांडणं. हो, जर प्रत्यक्ष भांडणं सुरु असतील तेव्हा मात्र सगळे आवडीने पाहायला जातील. पण या स्टार लोकांचे भांडणं होतात आपापसात आणि मिडिया त्याला चित्रपटाशी जोडून पसरवण्यात हातभार लावते. परत इथे मी मिडियाला विरोध करत नाही. इतर अनेक क्षेत्रात मिडिया खूप चांगलं काम करते. पण याविषयी मात्र वेगळंच घडतं. लोकांच्या मनात स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोष्टी रुजवून त्यांची मानसिकता विविध पद्धतीने बदलली जाते. अशा प्रकारे समाजाचा बरीकाईने मानसशास्त्रीय अभ्यास करून या गोष्टी तयार केल्या जातात. ज्याचा परिणाम कुठून ना कुठून विशिष्ट स्टारच्या चित्रपटावर होत असतो.
 जे स्टार नाहीत, पण कलाकार आहेत. त्यांचं आयुष्य अगदी साधं असतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर जास्त कोणी बोलत नाही. कारण ते ज्या इंडस्ट्रीत काम करतात, तिचा एकंदरीत राष्ट्रीय पातळीवरच्या भांडवलदारांना काही फायदा नसतो. मग कोण कशाला त्यांच्या विषयी मोठ्या बातम्या छापतील? अशावेळी हे गणितं आपल्याला मान्य करावे लागतात...

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …
सहन करू नका, विद्रोह करा.
डरपोक राहू नका, बंडखोर बना.
 - आशित साबळे

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …