Skip to main content

Post-Fandry experience

काय पिच्चर बनवलाय ल्येका...!!! मराठी चित्रपटसृष्टीतला एक क्रांतिकारी टप्पा म्हणजे "फँड्री"

Conceptual :-

 मला असं वाटतं की, फँड्री मधली प्रेमकथा ही त्या चित्रपटासाठी एक कथेचा आधार म्हणून वापरली. ती जाणीव तर होतेच की, त्या वयातले मुलं हे असं करतात आणि ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. मी तर म्हणेल ही प्रेमकथाच नव्हती, चित्रपटात दिग्दर्शकाने जब्याच्या मनातलं त्या मुलीबद्दल असणारं आकर्षण दाखवलं आहे. पण मुळात हा चित्रपट भारतातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. जब्याच्या मनात शालूसाठी जे काही आहे, त्याच्यासोबत त्याला त्याच्या जातीमुळे वाटणारी घृणा, न्यूनगंड आणि असमानता या गोष्टी त्याला आतून अस्वस्थ करत असतात.
 माणसाला त्याच्या जन्मासोबत त्याची जात फ्री मिळते, आणि त्याच जातीप्रमाणे त्या माणसाला वागावं लागतं आणि काम करावं लागतं. याच ठिकाणी सुरु होतो तो उच्च आणि "नीच" भेदभाव. कैकाडी (निम्न / अस्पृश्य) जातीतला हा मुलगा एका सवर्ण मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला ह्या सर्व जातीच्या भिंती तोडून समान जगायचं असतं आणि त्याला शाळेत मित्रांसमोर आणि शालूसमोर शायनिंग मारण्यासाठी साधी एक जीन्स पँट व टीशर्ट घेण्यासाठीची त्याची तळमळ आणि जिद्द आपल्याला दिसते आणि त्याचसोबत त्याच्या घरची आर्थिक, सामाजिक, भौगोलिक आणि मानसिक परिस्थिती किती वाईट आणि इतर जातीच्या लोकांपेक्षा वेगळी आहे तेही दिसून येतं. हुंडा देण्याची परिस्थिती नसलेलं हे कुटुंब व आजसुधा ग्रामीण भागात होत असणारी ही कहाणी आपल्याला खूप काही सांगून जाते.
 चित्रपटात सतत सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, गाडगेबाबा, अण्णा भाऊ साठे, यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर जब्या कसा या जातीने दिलेल्या कामाला नाकारतो, इतरांची तुच्छतेची जाणीव त्याला टोचत असताना तो त्या गोष्टीकडे कसं दुर्लक्ष करतो; त्याचा हा विद्रोह आपल्याला आपल्या महापुरुषांचा लढा डोळ्यासमोर आणतो. इतरांचा त्याच्याप्रती जो व्यवहार असतो तो सर्वांपेक्षा वेगळाच असतो कारण की तो अस्पृश्य आहे. गावकऱ्यांकडून त्याच्या कुटुंबाला डुक्कर पकडायला सांगणे, साफ सफाई करणे, घाण काढणे, इतरांची सेवा करणे ह्या सर्व गोष्टी कचरू करताना दिसतो. इथेच आपल्याला शतकानुशतके ही जातीव्यवस्था कशी चालत आलेली आहे हे दिसून येतं. कचरूसारखे असंख्य लोक अनेक वर्षे हा अन्याय सहन करत राहिले पण जब्यासारखा एकच येतो आणि ह्या जातीच्या उतरंडीला टोला देतो आणि भेदभावाच्या भिंती तोडून मानवी स्वातंत्र्य काय असतं हे दाखवून देतो.
 शालूला मिळवण्यासाठी त्याची धडपड, त्याच्या मित्राची (पिऱ्याची) मदत आणि चंक्यासारखं एक वेगळंच पात्र बघायला मिळतं. शाळेत/गावात असणारा आणि जब्याला त्याच्या कामावरून (जातीवरून) चिडवणारा तो मुलगा जब्याचा स्पर्धक/दुश्मन दाखवला आहे. चंक्याच्या सान्निध्यात राहून हळूच एका सीनमध्ये जब्याचं जादूटोण्यावर विश्वास बसणं (स्वप्न पडणं), हे सर्व त्या पात्रांना उठावदार बनवून गेलं.
  एखाद्याला त्याच्या वर्तमान परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्याला सध्या हातात असलेला व्यवसाय/काम हा करावाच लागतो; आणि हीच परिस्थिती "धग" या चित्रपटातसुद्धा दाखवली आहे. जेव्हा कचरू, जब्या आणि त्यांचा परिवार एक डुक्कर पकडण्यासाठी जातात तेव्हा त्याला फँड्री म्हटलंय. फँड्री म्हणजे डुक्कर. त्या फँड्रीला बांधून घेऊन जात असताना मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, गाडगेबाबा यांचे फोटो खूप काही सांगून जातात त्याच वेळेला गावातले काही वेगळ्या (उच्च) जातीचे लोक त्याला, त्याच्या आई आणि बहिणीला त्रास देतात, चिडवतात, छेडतात, नाव ठेवतात तेव्हा जब्याचा राग अनावर होतो आणि तो त्या लोकांना रस्त्यावरचं हातात येईल ते फेकून मारू लागतो, तो माणूस पुन्हा त्याच्याकडे येत असताना जब्या त्याला जो दगड मारतो, "तो दगड म्हणजे त्याचा विद्रोह असतो." एकूण इथल्या समाज व्यवस्थेने जी जातीची उतरंड आणि भेदभावाची मानसिकता शाबूत ठेवली आहे, त्यात अडकून आणि जब्याच्या भोवतालची जी काही परिस्थिती आहे; मग ती त्याचं वय, जात, समाज, कुटुंब, मुलीकडचं आकर्षण, सवर्णांकडून होत असणारी वागणूक, त्याचा त्याच्यावर व त्याच्या परिवारावर होणारा परिणाम, यात त्याची फँड्रीसारखी झालेली हालत हा सिनेमा आपल्याला दाखवतो.

Technical :-

 लोकेशन तर सर्वांना दिसतच आहे. पण मला प्रत्येक पात्रांबद्दल कुतूहल वाटतं की, त्यातले खूप जण नॉन अक्टर्स असूनही ते कुठेच चित्रपटात नसलेले वाटले नाही. सगळेच लोक चित्रपटात तितकेच खरे होते.
पात्रांची निवड तर मला पर्सनली खूप जास्त आवडली. ते कुठेच असे वाटले नाही की ते अभिनय करत आहेत किंवा त्यांच्यासमोर कॅमेरा आहे. अगदी घरात किंवा आपापसात ग्रामीण भागात लोकांची जशी वागण्याची, बोलण्याची पद्धत असते ती जसाशतशी चित्रित केली आहे. अगदी भाषेवरसुद्धा बारकाईने लक्ष दिलेलं आहे. जशी म्हातारी बोलते, तसा जब्या किंवा पिऱ्या बोलत नाही; पण असं असलं तरी बोली मात्र बदलत नाही. बऱ्याचदा ग्रामीण विषयावर चित्रपट झालेले पाहिलेत की ज्यात लोक ग्रामीण तर आहेत पण प्रत्येकाची बोली वेगवेगळी दिसते आणि दिग्दर्शक त्याकडे लक्ष ही देत नाही. कोण पश्चिम महाराष्ट्राची भाषा बोलतोय, तर कोण मराठवाड्याकडची, कोणी कोणी मध्येच विदर्भाची भाषा मिसळतात. असं फँड्रीमध्ये कुठेच काहीच दिसलं नाही.
 सुरुवातीचे जे कॅमेरा अँगल्स आहेत, ते तर थेट आपल्याला त्या गावात घेऊन जातात. जब्याचे क्लोजअप आणि तेव्हाच्या लाईट्स कुठेच अतिशयोक्ती वाटल्या नाहीत. शाळेत असताना शालूजवळ कॅमेरा ठेऊन जब्यावरून जो दुसऱ्या मुलाकडे फोकस शिफ्ट केला, ते तर अप्रतिम वाटलं.
 प्रेक्षकांच्या मनात स्टोरी रजिस्टर करण्यासाठी जे सुरुवातीला जातींनुसार पात्र डिझाईन केले, उदा:- वेदांत (ब्राम्हण), न्हावी, पाटील/सरपंच, इ. ते पोचले.
 पार्श्वसंगीत इतकं साधं असून चित्रपटात पुढे काय होणार आहे याची हुरहूर लावणारं आहे. शेवटची जी हलगी सोमनाथने वाजवली ती तर मला खूपच आवडली. पण एक खंत अशी आहे, की लोक क्रेडिट्स बघायला थांबत नाहीत.........
 काळा पक्षी आणि डुक्कर किंवा शेवटचा जो दगड जब्या फेकतो व इतर काही गोष्टी ह्या अॅनिमेटेड असून खर्याखुर्या वाटल्या.

Conclusion :-

  पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी, लाईट्स, संगीत, सर्वांचा अभिनय आणि दिग्दर्शन हे इतकं सुंदर जुळून आलेलं आहे की कोणीही हा चित्रपट न पाहता मारू नये असं मी सर्वांना सांगेल.

- आशित साबळे.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…