Skip to main content

विक्षिप्त अनुभव

(मी जात आणि धर्म या दोन्ही गोष्टी सोडून दिलेला व्यक्ती आहे, हे लक्षात घेऊन पुढील अनुभव वाचा.)

 दोन दिवसापूर्वी सकाळी माझ्या एका मित्राचा फोन आला. करिअरसाठी तो अनेकांना भेटतो, धडपड्या देतो. याच संदर्भात त्या मित्राला एक माणूस भेटला होता. त्याने मला आणि अजून एका मित्राला कॉल केला आणि म्हटला की "आपल्या करिअरची सुरुवात झालीच समज. ते सर खूप पैशावले आहेत आणि त्यांच्या खूप ओळखी आहेत. फक्त ठाण्याला येऊन त्या सरांची भेट घे." मी असं कोणाला भेटत नाही, पण त्या मित्राने खूप आग्रह करून मला बोलावून घेतलं.
 मी ठाण्याला गेलो, पुढे अर्ध्या तासाच्य प्रवासानंतर पत्ता शोधून त्या सरांकडे पोहोचलो. दुसरा मित्र आधीच तिथे पोहोचला होता. त्या सरांचा फोटोग्राफीचा क्लास होता तो त्यांनी सांगितला, त्याची फीस कमीच होती पण माझ्यासाठी जरा जास्तच होती. पण तो माणूस ज्या गोष्टीसाठी आम्ही त्याला भेटायला गेलो ते क्षेत्र सोडून सतत वेगळ्या विषयात घुसत होता. माझी इच्छा होती की त्याने चित्रपट आणि त्याच्या टेक्निकल बाबींवर आमच्याशी चर्चा करावी; तशी मानसिकता बनवूनच मी गेलो होतो. पण तो माणूस सतत जात, धर्म , समाज आणि राजकारण यावरच बोलत होता. मध्येच त्याला कोणी भेटायला आला की त्याच्याशी खूप वेळ गप्पा मारून त्याने आमचा खूप वेळ वाया घालवला. असाच, त्याचा एक मित्र आला आणि गप्पा मारता मारता त्याने (त्या सरांनी) ब्राम्हणांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याने लगेच मला आणि माझ्या मित्राला विचारलं की तुम्ही ब्राम्हण आहात का? आम्ही नाही म्हणून उत्तर दिलं. त्या सरांचा मित्रच पुढे ब्राम्हण निघाला आणि त्याचा पोपट झाला. मग त्याने आमची जात कोणती ते विचारलं. आम्ही जे खरं आहे ते सांगितलं. त्याने, माझी जात ऐकताच माझ्या जातीच्या लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली आणि त्याचा तो राग त्याच्या ब्राम्हण द्वेषापेक्षा जास्तच होता. पण तो म्हणाला की, तो गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खूप मानतो. मग विषय "नितीन आगे"च्या प्रकरणावर वळला. त्या माणसाने नितीनवर घडलेल्या संकटाचं वर्णन "हसत हसत" केलं; अगदी त्याच्या शरीरावर केलेल्या जखमा तो आम्हाला "हसत हसत" सांगत होता. मी त्याला असं दाखवलं की मला काहीच माहित नाही. आणि त्याचं बोलणं संपल्यावर नितीनची संपूर्ण कथा मी त्याला शांतपणे सांगितली. मग त्याने तपशिलात माझी विचारपूस केली आणि मी माझ्याबद्दल सांगितलं.
 माझ्यासोबत असलेल्या मित्राला "नितीन आगे" हे प्रकरण माहीतच नव्हतं. त्याला त्याच्या आयुष्याची सुरुवात कशी करावी हे ही माहित नव्हतं आणि कशामध्ये करिअर करावं हे सुद्धा ठरलं नव्हतं. तरीही त्या माणसाने आमच्यासमोर एका व्यक्तीला फोन केला आणि त्याच्याबद्दल (माझ्या मित्राबद्दल) सर्व काही सांगितलं आणि त्याची पूर्ण मदत केली. माझ्यासोबतचा तो मित्र मराठा जातीचा होता. तो समोरचा माणूस त्याचं नाव बदलून बसला होता, अगदी विझिटिंग कार्डवरसुद्धा त्याचं बदललेलं नाव होतं. आम्ही त्याला यासंदर्भात काहीही न विचारता तो उगाचच सतत म्हणत होता, "माझी बायको मराठा-देशमुख आहे, पण मी माझी जात नाही सांगणार..." मग त्याने त्याच्या बायकोला फोन लावला आणि आमच्यासमोर रोमँटीक गप्पा मारू लागला. मी आणि माझा मित्र आपापसात गप्पा मारून त्याकडे दुर्लक्ष करत होतो तरी तो टेबलवर हात आपटून आम्हाला त्याच्या गप्पा ऐकवायला बोलवत होता.
 पुढे, फोन ठेवल्यावर त्याने मला Success ह्या शब्दाची व्याख्या ३ शब्दात विचारली. मी लगेच सांगत होतो पण त्याने मला थांबवलं आणि बोलला की दोन मिनिटं विचार कर, मग संग. तो बोलला की "हे सांगितलं तर तुला माझा कोर्स फ्री, येण्याजाण्याचा खर्च पण मीच देणार." मी दोनच शब्दात सांगितलेली व्याख्या त्यला पटली नाही आणि मग उठला आणि स्टुडीओ मधल्या लेक्चरच्या फळ्यावर त्याने एका पुस्तकात वाचलेली व्याख्या मला सांगितली. मी बोललो मला नाही पटली ही व्याख्या. तर तो म्हणाला की ही माझी व्याख्या असती तर मी तुमचं ऐकलं असतं, पण ही एका मोठ्या लेखकाच्या पुस्तकात लिहिलेली आहे, म्हणून मला ही व्याख्या पटली.
 त्याने आधीच सांगितलेलं की तो जिल्हा परिषदच्या शाळेत फक्त नाऊवी शिकलाय आणि कोणत्यातरी एका मोठ्या माणसाचं inspiring असं वाक्य ऐकून त्याने शाळा सोडली. त्याने आम्हा दोघांना आमचं शिक्षण विचारलं तर आम्ही नुकतंच कॉलेज संपलं असं सांगितलं. तर तो आमच्यावर हात दाखवून मोठमोठ्याने हसू लागला आणि म्हणाला "हा फरक आहे तुमच्या आणि माझ्या शिक्षणात." आम्ही त्याच्या फुगिरीला वैतागलो. पण तोवर संध्याकाळ झाली होती. आम्ही नऊला तिथून निघालो आणि असं वाटलं "सुटलो एकदाचा"...

सारांश:-
१. त्याने माझ्या मराठा जातीच्या मित्राला पूर्ण मदत केली व संपर्कात राहायला सांगितलं.
२. त्याने मला कसलीच मदत केली नाही. माझी तशी अपेक्षाही नव्हती. ठाण्याच्या मित्राच्या अति-आग्रहाखातर मी गेलो होतो.
३. माणसाने कधीही हवेत न जाता जमिनीवर राहावं. त्याचा (चांगला/वाईट) परिणाम समोरच्यावर होतो.
४. जाती धर्माचा चष्मा काढून जगात वावरावं.
५. माणसाने पुस्तकं वाचावेत, पण स्वतःच्या मेंदूचासुद्धा वापर करावा.
६. आज मी त्या माणसाचं वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे जाणतो; पण ज्या निमित्ताने (चित्रपटावर चर्चा करायला) मी तिथे गेलो होतो, त्या संदर्भात मला काहीही आठवत नाही.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…