Skip to main content
    दलितांवर होणारे अत्त्याचार दिवसेंदिवस आणि तासंतास वाढतच जात आहेत. हे दलित केवळ धर्मांतर केलेले बौद्ध नसून हिंदू धर्मात आजही टिकून(?) असलेले खालच्या जातीतील लोक. दलित म्हटलं की, महार, मांग आणि काही अंशी चांभार अशा काही निवडक जाती सर्वसामान्य लोकांच्या मनात येतात. मुळात दलित म्हणजे कोणत्याही जाती, जमाती, वर्ण, वर्गातील पिढीत, शोषित, वंचित लोक. ज्यांच्यावर अत्त्याचार होत (आले) आहेत असा समाज म्हणजे दलित. पण भारतातील समाजव्यवस्थेने इथल्या सध्याच्या मानसिकतेनुसार दलितांनाच दलित बनवून ठेवलं आहे, त्यामुळे जे जाती निर्मुलनासाठी काम करतात त्यांनाच डोळ्यासमोर ठेऊन त्या "आंबेडकरी" सामाजाव्यातिरिक्त कोणताच समाज लोकांना दलित म्हणून दिसत नाही.
    अहमदनगर जिल्ह्यात नुकतेच घडत असलेले प्रकार पाहून आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून त्या भागाला "कास्ट प्रोन" म्हणजेच जातीव्यवस्थेच्या भेदभावाने ग्रस्त घोषित करा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकाच आठवड्यात जातीभेदाचे चार प्रकार समोर आले आहेत. नितीन आगे या तरुणाची अमानुष हत्या, एका दलित स्त्रीच्या मृतदेहाचा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास सवर्णांचा विरोध, एका बौध्द कुटुंबाच्या घराची नासधूस करून त्यांचं घरातील समान आणि तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्या घराबाहेर फेकून त्यांना बेघर करणे, गावाच्या जत्रेत शिवाजी महाराजांच्या गाण्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गीत लावल्यामुळे सवर्णांनी जत्रेतील दलितांवर केलेली दगडफेक. गेल्याच महिन्यात आंबेडकर जयंतीमध्ये जातीयवाद्यांनी जयंती साजरी करणाऱ्या लोकांवर केलेली दगडफेक; साताऱ्यात एका मातंग जातीच्या स्त्रीची गावातून नग्न धिंड काढणे. काही वर्षांपूर्वी झालेली खैरलांजी. त्याही आधीची नामांतर चळवळ, रमाबाई नगर हत्याकांड, आणि संपूर्ण भारतातील अशा कित्येक घटना लक्षात घेतल्या तर आपल्याला हे कळेल की एकूण भारतीय समाजात जातीमुळे आलेला फुकटचा गर्व आणि त्यातून घडलेले समाजातील दुर्बल घटकांवारचे वाईट परिणाम हे मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्या घटनांचे फार मोठे आणि भयानक चित्र उभे करणारे उदाहरण आहेत; आणि या सर्व प्रकरणात पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा हा निषेधार्य आहे. समाजाची एकूण परिस्थिती ही दलितांच्या विरोधात दिसते. जिथे कुठे अॅट्रॉसिटीचे प्रकार घडतात, तिथे नेहमी रिपाई किंवा आंबेडकरी विचारांच्या लोकांनीच जाऊन भेट का द्यावी? इतर पक्ष/संघटना या भेट देण्याचे तर सोडा, पण त्यांना न्याय मिळवून देण्यातसुद्धा त्या संघटनांचा सहभाग नसतो; फक्त मत मिळवायचे धंदे यांना करता येतात. कोणी साधे त्यावर आपले मत (निषेध) देखील मांडत नाही. सत्तेत असल्येल्यांना नाविलाजाने यावर बोलावं लागतं हे त्यांच्या बोलण्यावरूनच दिसून येतं. खर्डा गावातल्या नितीन आगेच्या हत्येनंतर तेथील पालक मंत्री मधुकर पिचड यांनी केलेलं दुर्लक्ष आणि आरामात त्यांचे कामं उरकून घेतलेली पीडितांची भेट. बीड, नगर, जालनासारख्या जिल्ह्यांमध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचं वर्चस्व. आजसुद्धा नगरच्या काही गावांमध्ये मागासलेल्या गरिबांना अस्पृश्य मानून लांबून वरून पाणी दिलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला तेथील दलितांची परिस्थिती सांगून जातात.
    अश्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. "दलित पँथर"सारख्या आक्रमक संघटना पुन्हा उभी करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतःवर घ्यायला हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला "समता सैनिक दल", गुजरातमध्ये अस्तित्वात असलेला "स्वयम सैनिक दल" अशा संघटनांनी ठोस भूमिका घेऊन या अत्याचारांच्या विरोधात उतरून लढा दिला पाहिजे. सुरुवातीपासून दलित म्हणून पुढे आलेल्या समाजाच्या वाटेलाच सर्वात जास्त संघर्ष आलेला आहे; हे ओळखून राजकीय क्षेत्रात गटातटाचे राजकारण बंद करून एकत्र येण्याची समाजाला खूप जास्त गरज आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज उभा करणे अशक्य आहे. अशा सर्व संघटना आणि राजकीय पक्षांनी वैयक्तिक वाद विसरून एकरूप झाल्यावर एकच सर्वात मोठा पक्ष तथा संघटना निर्माण होईल, ज्याने समाजातील अशा अमानवी घटनांना रोखण्यास मदत होईल.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…