Skip to main content

आजचा दिवसभराचा अनुभव

 आज खूप आनंद होत आहे की मी अशा ठिकाणी जाऊन आलो जिथे महाराष्ट्रातला एक प्रचंड मोठा इतिहास घडला आहे; ते म्हणजे "भीमा-कोरेगाव".
माटुंगा रोडवरून निघालो, दादरवरून CST ट्रेन पकडायची होती. पहाटे CST लोकल ७ मिनिटं उशिरा आली. CST वरून "इंद्रायणी एक्स्प्रेस" पकडायची होती. एका ट्रेनमुळे संपूर्ण प्लान बिघडला. जाम वैतागलो त्या लोकलच्या टाईमिंगवर. शेवटी ठरवलं की, तीच पुण्याची ट्रेन आता दादरवरूनच पकडणार, तेही विदाऊट तिकीट. सगळे मित्रमंडळी खूप अगोदर CSTला जाऊन बसल्यामुळे माझी सीट राखून ठेवली होती. मजा मस्ती करत पुण्याला पोहोचलो. दोन दिवस अगोदर पुणे स्टेशन बाहेर काहीच नसताना आदल्या दिवशी तिथे काम सुरु केल्याने बाहेर जाण्यासाठी फक्त एक गल्ली उपलब्ध ठेवली होती. प्रचंड गर्दी तिथेच खूप वेळ पॅक झाली, हळू हळू आम्ही बाहेर पडलो.

 बस स्थानकावरून भीमा कोरेगावासाठी स्पेशल बसेस सोडण्यात येत होत्या. आम्ही बसमध्ये चढलो आणि पटापट जागा धरली. जिथे मी बसलो होतो, तिथेच बाजूला एक चाळीशीतला माणूस आला. कदाचित दारू पिऊन आला असावा, खूप बडबड करत होता. आधीच तिथे सुरतहून एक "मोरे" नावाचे जयभीमवाले मुस्लीम गृहस्थ उभे होते. तेही भीमा कोरेगावालाच चालले होते. तो चाळीशीतला माणूस त्यांच्या दाढीकडे पाहून त्यांना त्यांच्याबद्दल विचारू लागला. त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं की, "मी मुळचा मराठी. मुस्लीम परिवारात जन्मलो, पण शेवटी दलित; कारण मी गावातले संडास-गटार साफ करायचो. पण बाबासाहेबांना पाहून शहरात आलो, राहणीमान सुधारलं आणि आधीपेक्षा जरा चांगली नोकरी लागली. त्यामुळे मी भीमा-कोरगाव, चैत्यभूमी, दीक्षाभूमी अशा ठिकाणी महत्वाच्या दिवशी जात असतो." समोरचा व्यक्ती खूप खुश झाला; आजुबाजुवाल्यांना त्या मोरे काकांचं कौतुक सांगू लागला. आंबेडकरी चळवळीवर बऱ्याच गप्पा झाल्या. तो जरा हायपर होत होता, इतकी उत्सुकता त्या माणसात होती. मोरे मात्र शांततेनेच बोलत होते. तो माणूस माझ्या काही मित्र-मैत्रिणींकडे वळला. खूप बडबड ऐकवली त्यांना. (मी मागून त्यांचाकडे बघून हसत होतो.) त्यांनी त्याला काही प्रतिसाद दिला नाही. तो माणूस जरा पुढे गेला आणि एका विदर्भातल्या व्यक्तीला त्याची भुन्भून ऐकवायला सुरुवात केली. बोलण्यावरून जरी तो वेडसर वाटत होता, पण इतिहास मात्र संपूर्ण योग्य सांगत होता. न थांबणारी त्याची वटवट ऐकून तो विदर्भीय म्हणाला की, "अहो! तुम्ही मले कहाय्ले सांगू रहाले. तुम्ही काय प्रगती केली मले सांगा, मग बोला." पण त्या माणसाचं तोंड काय बंद होईना... त्याने मग भांडणाच्या सुरात मोठ्या आवाजाने हिंदू कोड बिल, OBC आरक्षण, मंडल आयोग, सांगायला सुरु केलं. सगळेच त्रस्त झालेले त्याच्या आवाजाला. बसमधून उतरल्यावर पण त्याने लोकांना पकडून बोलायचं थांबवलं नाही.

 कसाबसा गर्दीतून विजयस्तंभाकडे पोहोचलो. बघतो तर काय! लोकांनी तिथे फुलं, अगरबत्ती, मेणबत्ती हे सगळं एका ताटात सजवून विकायला ठेवलं होतं. पुढे विजयस्तंभाच्या प्रवेशावर काही बायका समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना विचारत होत्या की, "चप्पल कुठे काढायच्यात?" त्याच ठिकाणी काही लोक "हे आहे आपले प्रेरणास्थान, नका करू याला तीर्थस्थान" असे लिहिलेले पत्रकं वाटत होते आणि तिच गोष्ट माईक मध्येसुद्धा सांगत होते, याचं बरं वाटलं. माझ्या कॅमेरामध्ये जरा तिथलं सगळं ते शूट केलं आणि संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे गेलो. त्याच ठिकाणी एका बाजूच्या हॉलमध्ये शाळा भरलेली होती आणि तिथेच सगळे महाराजांचे फोटो होते. मुलांना जरा त्यांच्या तासात व्यत्यय आलाच असणार; कारण खूप लोक तिथे ते पाहायला तिथे जात होते.

 असो! एकंदर अनुभव चांगला होता. दोन ऐतिहासिक स्थळ पाहायला मिळाले याचं समाधान आहे. पण ते ऐतिहासिक ज्या शहीदांमुळे झाले त्यांची आठवण मात्र आयुष्यभर माझ्या व संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात राहील.

- आशित साबळे

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …
सहन करू नका, विद्रोह करा.
डरपोक राहू नका, बंडखोर बना.
 - आशित साबळे

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …