Skip to main content

लोकशाहीचा राँग टर्न

(टीप: हा लेख निवडणुका संपल्यावर जवळपास एक आठवड्याने लिहिला होता. याला काही वर्तमानपत्रांत प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले, पण  त्यांच्याकडून योग्य ती  प्रतिक्रिया न मिळाल्याने मी तो संपूर्ण लेख इथेच, माझ्या ब्लॉगवर पब्लिश करत आहे.)


समजा, आपण एखाद्या वाहनात बसून चाललो आहोत आणि आपल्या चालकाला आपण सरळ जाण्यास सांगितलं पण अचानक चालकाने भलतीकडेच गाडी वळवली तर आपण त्याला विचारणार, प्रश्न करणार. त्याने जरी उत्तर दिलं की आपण योग्य रस्त्यावर आहोत, किंवा हा रस्ता चांगला आहे, किंवा इथून आपण लवकर पोहोचू, तरी आपल्या मनात संकोच असतोच. पुढे बराच वेळ प्रवास करून आपण आपल्या योग्य ठिकाणी पोहोचलोच नाही आणि तरी चालक गाडी बेधुंदपणे चालवत आहे आणि आपल्याला रस्ता ओळखीचा वाटत नाही, तेव्हा आपण त्याला रागवणार, ओरडणार, भांडणार आणि गाडीतून उतरणार किंवा स्वत:ची गाडी असेल तर त्याला गाडीबाहेर काढून स्वत: योग्य ठिकाणी पोहोचणार. पण आपण असं करत नाही आहोत. आपण चालकाला प्रश्नच विचारत नाहीत. आपल्या वतीने प्रश्न विचारायलासुद्धा कोणी नाही. हेच आज आपल्या देशात आणि राजकारणात होतंय!

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जे यश मिळालंय त्यावर स्वतःचं विवेक जागं असणाऱ्या माझ्यासारख्या तरुणाला नक्कीच संशय येतो. मतपत्रिका वापरून निवडणूक व्हावी अशी देशातील सर्व नागरिकांची मागणी होती, तशी विनंती देशातील अनेक प्रमुख पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली केली, तरीही निवडणूक आयोग ती मागणी न ऐकता त्यांना जे करायचंय ते करतं. लोकांचा विश्वास बसण्यासाठी ज्यावेळेला निवडणूक आयोग मतपत्रिकेऐवजी VVPAT सारखी मशीन मतदान यंत्रासोबत उपलब्ध करते, किमान त्यावेळेस तरी त्या VVPAT मधील पावत्यांच्या आधारे मतमोजणी व्हावी अशी मागणी पुन्हा सर्वच करू लागले. ही मागणीसुद्धा निवडणूक आयोगाने ऐकली नाही आणि मतदान यंत्र हॅक होऊ शकतं असं माहीत असूनसुद्धा ते नाकारलं आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनेच मतमोजणी झाली. एक्झिट पोल्सचे आकडे माध्यमांमध्ये येऊ लागले आणि त्या आकड्यांनाही पार करत भाजपला अफाट मतं मिळाली. 

याच निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना अनेक क्लीन चीट दिल्या. या क्लिन चिट्सला निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी विरोध दर्शवला होता. तरीही मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मोदी आणि शाह या दोघांवर कसलीही कारवाई केली नाही. लावासा यांनी त्यांच्या विरोधी मतांची नोंद होत नाही आणि देशातील कारभारामध्ये पारदर्शकता हवी असं स्पष्ट करून आयोगाच्या पुढील बैठकीस न येण्याचे मुख्य आयुक अरोरा यांना कळवले. 

जर सर्व राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांची मागणी आहे की इ.व्ही.एम ने निवडणूक केली ती केली, पण किमान आता VVPAT ने तरी मतमोजणी करा, तेही निवडणूक आयोगाला मान्य नाही. त्याचं कारण एकच की निवडणुकीचा निकाल लावण्यात उशीर होईल. यात कोणालाच काहीच समस्या नव्हती. उशीर जरी लागला असता तरी देशात राष्ट्रपती शासन लागणार नव्हतं, जे सरकार आहे तेच सलग निकालापर्यंत राहिलं असतं, त्यामुळे भाजपलाही आक्षेप घेण्यात जागा नव्हती. मग VVPAT मशीन ही फक्त प्रदर्शनासाठी लावली असा निष्कर्ष काढण्यात येतो. कारण मला दिसणार की मी कोणाला मत दिलंय, पण माझ्यासारख्या इतर किती लोकांनी त्याच उमेदवाराला मत देऊन जिंकवलय की नाही हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे आणि किमान एवढ्या पारदर्शकतेची मी अपेक्षा आणि मागणीही करूच शकतो. पण त्याची सुप्रीम कोर्टातसुद्धा दाखल घेतली गेली नाही. 

उत्तर प्रदेशामध्ये सपा-बसपा गठबंधन हरल्यामुळे मायावतींनी निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली आहे आणि म्हणूनच मतपत्रिकेच्या मागणीनंतरही इ.व्ही.एम वापरून व त्यात घोटाळा करून भाजप सत्तेत आली असं पत्रकार परिषदेत म्हटलं. सपा-बसपा आघाडी तर सत्तेत येण्याच्या तयारीत होती पण बहनजींच्या मते इतक्या वाईट निकालांची अपेक्षा नव्हती. दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेससकट अनेक प्रादेशिक पक्ष व त्यांचे नेते हरले. पश्चिम बंगालमध्ये भाजपने खूप मोठ्या प्रमाणावर मत घेत तृणमूल कॉंग्रेसला चिंतीत केलं. तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने वादळ उठवूनसुद्धा त्यांना फक्त औरंगाबादची एकच जागा जिंकता आली. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यानुसार कॉंग्रेस ही मुळात हरण्याच्याच मानसिकतेने लढली, त्यासोबत त्यांनीही कोणत्याही इलेक्ट्रोनिक उपकरणाप्रमाणे इ.व्ही.एम सुद्धा हॅक करता येते हे ठामपणे नमूद केलं. 

प्रत्येक पक्षाची काही ना काही विचारधारा असते. पण या निवडणुकीदरम्यान आपण पाहिलं की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक लोक भाजपात आणि शिवसेनेत गेले. यावरून हे लक्षात येते की सामान्य हिंदूंचं ध्रुवीकरण करण्यासाठी अस्तित्वात आणलेली हिंदुत्व ही विचारधारा सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांनाही मान्य आहे आणि म्हणूनच इतके बिनदिक्कतपणे हे नेते एकमेकांच्या पक्षात येतात जातात, त्यांना तिकीटही मिळतात, नवीन पक्षाचं पाठबळ मिळवून निवडणूक लढवतात आणि निवडूनही येतात. हे सगळं इतकं आरामात कसं होतं? भाजप हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांवर इतका भरोसा कसा काय ठेवू शकतो? त्यामुळे कॉंग्रेस जरी भाजपवर अनेक आरोप करत असेल तरीही त्यांनी लक्षात ठेवावे की भाजप मोठा करण्यात त्यांच्याच लोकांनी त्यात सामील होऊन मदत केली. याचा तोटा हा देशाला नक्कीच होणार, कारण जेव्हा प्रादेशिक पक्ष संपवून देशात एकच पक्ष मोठा होतो आणि तोच पक्ष संपूर्ण देशावर राज्य करतो त्यावेळेला ते मनमानीच्या कारभाराकडे वळतात. कोणताही देश जेव्हा एखाद्या पक्षाला एकहाती सत्ता देतो, आणि बहुपक्षीय प्रणाली जेव्हा एकाच पक्षाकडे जाते तेव्हा त्या देशाच्या मूळ व्यवस्थेला तो धोका निर्माण करतो. त्यात तो पक्ष जर भाजपसारखा ज्वलंत हिंदुत्वादी असेल तर आणि त्याच्यामागे रा.स्व. संघासारखी ताकत असेल तर नक्कीच तो देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो. 

भाजपने उघडपणे आता अतिरेकी व्यक्तीला उमेदवारी देऊन त्या प्रज्ञा ठाकूरला निवडून आणलंय. आपल्या लेखी कोणत्याही गुन्हेगाराला उमेदवारी देणे हे चुकीचं आहे, पण भाजपची ती चूक नसून तो चलाखीचा डाव होता. भाजपने त्या प्रज्ञा ठाकूरला पक्षात घेतलं, इथेच त्यांची विचारधारा स्पष्ट होते की ह्यांना देशात काय वातावरण पाहिजे. मध्य प्रदेशात माझ्या ओळखीचे काही राजकारणाकडे लक्ष ठेवणारे मित्र आहेत. त्यांच्याशी मी सतत संपर्कात होतो आणि त्यांचं म्हणणं होतं की प्रज्ञा सिंघ निवडून येणार नाही, कारण तिथे बऱ्यापैकी लोक हे सजग आहेत. जरी काही लोकांनी मत दिलं जरी असेल तरी तिची जिंकण्याची परिस्थिती बिलकुल नव्हती. पुन्हा तिथे इ.व्ही.एम. वरच सर्वाना संशय येतो. देशातील सर्व वंचित घटकांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या ऐवजी असे लोक संसदेत गेले तर हा देश धर्मनिरपेक्षता सोडून धर्माधीष्टीत राज्य बनेल. 

आपल्याकडच्या लोकशाहीमध्ये असणारी पारदर्शकता संपली आहे असंच चित्र सगळीकडे दिसत आहे. एकीकडे भाजपचा एक अनंत कुमार हेगडे नावाचा मंत्री “आम्ही इथे संविधान बदलण्यासाठी आलो आहोत आणि लवकरच ते बदलू” असं विधान करतो. एका वर्षाच्या आत एक जातीयवादी समूह दिल्लीत संसदेसमोर येऊन पोलिसांच्या डोळ्या देखत संविधान जळतो आणि कोणालाच अटक होत नाही. नंतरही सर्व प्रक्रिय संथगतीने चालते, त्यात कुठेच तत्परता नाही. लोकांना जातीमुळे, जातीने दिलेल्या व्यवसायामुळे, धर्मामुळे, विचारांमुळे जीव गमवावा लागतोय. हे जीव घेणारे, स्वतःला गोरक्षक म्हणवणारे, कट्टर हिंदुत्ववादी अतिरेकी भाजपचे समर्थक निघत आहेत. डोक्याला भगव्या पट्ट्या लावून समूहाने एकट्या व्यक्तीवर हल्ले होत आहेत. ह्या सर्व देशासाठी धोक्याच्या घंटा आहेत. 

देश म्हणजे एक जमिनीचा तुकडा आणि त्याच्या सीमा हे नसून देश आपण आहोत, माणसं. आपल्या एकमेकातल्या व्यवहारातून, प्रेमातून, मदतीतून, व्यवसायातून, विचारांतून, शिक्षणातून, कलेतून, विज्ञानातून हा देश बनतो. इथे माणसच एकमेकांना कापून ठार करत असतील तर उरलेल्या लोकांनी राज्य कोणावर करायचं हा प्रश्न निर्माण होईल. म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे लक्षात ठेवून त्यांनीच ह्या देशासाठी जे संविधान लिहून आपल्याला लोकशाही दिली, तेच संविधान आणि तीच लोकशाही वाचवण्यासाठी आपण जागरूक नागरिक म्हणून आपला इतिहास आणि आपली भविष्यातली प्रगती ओळखून सरकार निवडलं पाहिजे आणि भगतसिंगाने सांगितल्यानुसार तरुणांनी राजकारणात सामील झालं पाहिजे.

- आशित 

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.