Skip to main content

कलेचं मूळ आणि महत्त्व

(हा लेख दैनिक सकाळसाठी ५०० शब्दांत लिहिलेला, पण इथे तो माझे अनुभव सांगून अजून विस्तृत पद्धतीने लिहिला आहे.)


लहानपणापासूनच चित्रपट बनवायची इच्छा होती, पण ह्या सर्व गोष्टी कश्या असतात हे मला माहित नव्हतं. मी सातवीत असतानाच नास्तिक झालो. त्यामुळे देवधर्म करण्याऐवजी मी वाचू लागलो. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. माझा देव या संकल्पनेवरचा विश्वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्न पडू लागले. याच कारणामुळे माझं वाचन कथा कादंबरी भोवती नसून वैचारिक आणि तत्वज्ञानाशी निगडीत पुस्तकात मला रस होता. मी सुरुवातीच्या काळात वाचलेल्या पुस्तकांपैकी दोन ठळकपणे आठवतात – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं “राम आणि कृष्णाचं गौडबंगाल” आणि शहीद भगत सिंह लिखित “मी नास्तिक का आहे?”. या दोन पुस्तकांमुळे माझे विचार अजून स्पष्ट झाले आणि मला खात्री झाली की माझा नास्तिक होण्याचा निर्णय योग्य होता.

मी रुईया महाविद्यालयात बी.एम.एम. शिकत असताना मला काही असे मित्र मैत्रिणी भेटले ज्यांच्यामुळे माझ्या वाचनाचा वेग वाढला. महात्मा ज्योतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, अण्णाभाऊ साठे ते आत्ताचे कॉ. गोविंद पानसरे, डॉ. भारत पाटणकर आणि अनेक लेखकांचं साहित्य वाचनात आलं. याच माझ्या कोलेजच्या काळात मी पुरोगामी चळवळीला जवळून पाहू लागलो. सामाजिक कार्यक्रम पाहत असताना संभाजी भगत आणि इतर कलाकारांना पाहून त्यांचं अप्रूप वाटलं. लहानपणापासून लोकशाहीर विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांचे गाणे ऐकून एकदम भारी वाटायचं. तेव्हापासूनच हे लक्षात आलं की आपल्याला लोकसंगीत खूप आवडतंय. जेव्हा पहिल्यांदा मी एका आंदोलनामध्ये संभाजी भगत यांना रस्त्यावर गाणं गाताना पाहिलं तेव्हा मला वाटलं की हे शाहीर रस्त्यावर आंदोलनात येऊन गातात, तिथे असलेला जमाव त्यांना बघतो ऐकतो आणि सगळे निघून जातात. तेव्हा मी ठरवलं की ही कला आणि या कलाकारांचे विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण यावर अभ्यास करून हे सर्व व्हिडियो स्वरुपात रेकॉर्ड करू आणि याचा माहितीपट बनवू.

मी माझे वैयक्तिक विचार बाजूला ठेवून माहितीपटाचा एकूण आराखडा बनवला, दैववादी व पारंपारिक शाहिरीपासून सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने वाचन सुरु केलं. अण्णाभाऊ साठे, अमर शेख, आत्माराम पाटील, विठ्ठल उमप अश्या असंख्य शाहिरांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांच्या आयुष्यावर इतरांनी लिहिलेली पुस्तकं वाचून काढली आणि तेव्हा समजलं की कोणतीही कला समजून घेण्यासाठी फक्त कलेबद्दल वाचन नाही तर त्या काळात असलेली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मी माझ्या माहितीपटाचा आवाका वाढवला. काही प्रमाणात अभ्यास झाल्यावर समजलं की शिवकाळाच्याही आधीपासून शाहिरी ही कला अस्तित्वात आहे. शाहिरी या कलेचा एक हजार वर्षापूर्वीचा संपूर्ण इतिहास समोर आणायचं ठरवलं. यात पारंपारिक शाहिरी, गोंधळ, लावणी, शिवकालीन शाहिरी, सत्यशोधक चळवळ, पेशवाई, तमाशा, ब्रिटीश कालीन राष्ट्रीय शाहिरी, आंबेडकरी जलसे, गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, लाल बावटा कलापथक, आधुनिक शाहिरी, कामगार रंगभूमी, आणि विद्रोही शाहिरी, असे अनेक आणि यापेक्षाही जास्त टप्पे या माहितीपटात समाविष्ट केले आहेत.

कॉलेजात पदवीच्या दुसऱ्या वर्षात असताना म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी सुरु केलेलं हे संशोधन आणि माहितीपट बनवण्याचे प्रयत्न मी कॉलेजच्या अभ्यासासह सुरु ठेवले, वर्ष २०१४ मध्ये मी पदवीधर झालो आणि तीन वर्षांनी म्हणजे २०१६ ला मी “शाहिरी” या नावाचा माहितीपट एकट्यानेच बनवून पूर्ण केला. याच काळात एडिटिंग (संकलन) साठी मी अनेक लोकांना मदत मागितली, फार कमी लोक भेटले, जे भेटले त्यांनी खूप पैसे मागितले. मग मी स्वतःच एका सरकारी संस्थेत फिल्म एडिटिंग शिकलो आणि रोज जवळपास १८ तास बसून माहितीपट पूर्ण केला. महाराष्ट्रभर फिरत असताना स्थानिक पातळीवर अनेकांनी खूप मदत केली. माझे मित्र निखील बोर्डे आणि प्रफुल्ल कांबळे यांची धावपळ विसरून चालणार नाही; आणि नीलम सकपाळ हिने तर लिखाणात आणि स्क्रिप्ट बनवण्यात खूप कष्ट घेऊन मोलाची मदत केली.

लोक म्हणतात की जगात माणुसकी राहिली नाही. या सर्व प्रवासात या गोष्टीचाही अनुभव आला. एकदा मराठवाड्यात असताना जालन्याला गोंधळी व शाहीर अप्पासाहेब उगले यांची मुलाखत शूट करून बीडला जायचं होतं. एकटा फिरत असल्याने सर्व सामानाचं ओझं माझ्या पाठीवर. संध्याकाळी एकच बस जालना ते बीड होती. मी स्थानिक नसल्याने बस उशिरा पकडली, तेव्हा ती भरलेली होती. मी माझी बॅग खाली ठेवून उभा राहिलो. तीन तासाचा प्रवास सुरु झाला, त्यात आपले रस्ते लय भारी! दोन अडीच तास उलटून गेल्यावर एकाला विनंती करून सीटच्या कोपऱ्यावर बसलो. थोड्या वेळाने तो ढकलू लागला. शेवटी मी पुन्हा उठून उभा राहिलो. त्याने नीट बसूच दिलं नाही. बस बीडला पोहोचायला उशीर झाला. सडे तीन तासाच्या वर वेळ लागला. पूर्ण वेळ मी माझ्या जड बॅगेला सांभाळत उभाच होतो...

पण दुसऱ्या बाजूला माणुसकीचे जास्त प्रत्यत आले. जितक्या शाहिरांना मी भेटलो, त्या प्रत्येक कलावंताने माझा इतका चांगला पाहुणचार केला की प्रवासात आलेले सर्व वाईट अनुभव मी विसरून जायचो. त्यात प्रभाकर वाईकर यांच्यासारखे शाहीर भेटले ज्यांनी गांधीजींसोबत काम केलेलं होतं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना त्यांना गोळ्या लागलेल्या त्यांनी दाखवल्या, त्यांना ब्रिटिशांनी जेलमध्ये टाकलं होतं. त्यांची मुलाखत झाल्यावर मी एक स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी जेवण करण्याचा आनंद घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या सक्ख्या लहान बहिण “जाईबाई भगत” भेटल्या. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहून पाहून गीत लिहिली, त्या वामनदादा कर्डक यांच्या सहकार्यांनासुद्धा भेटण्याचा योग आला. अश्या भेटी या वयात झाल्या हे मला एक प्रकारे यश मिळाल्यासारखंच होतं.

२०१६ ला “शाहिरी” ही नाशिकच्या “अंकुर फिल्म फेस्टिवल”मध्ये दाखवण्यात आली. स्क्रीनिंग संपल्यावर पाहिलं की आजूबाजूच्या कोलेजमधून आलेले मुलं मुली त्यांच्या वह्यांमध्ये नोट्स लिहित होते. हेच माझं यश आहे. तिथे मला पुरस्कार मिळाला. पुढे औरंगाबादच्या “नागसेन फेस्टिवल २०१७” मध्ये प्रख्यात पत्रकार “निखील वागळे” यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. पण आपल्याकडे एक शोकांतिका आहे की बहुसंख्य भारतीय चित्रपट सोहळे हे माहितीपटापेक्षा लघुपट आणि व्यावसयिक चित्रपटाला जास्त महत्त्व देतात. सरकारच्याही राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शकांना बऱ्याच तांत्रिक अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत, ज्यामुळे माझ्यासारखे फिल्ममेकर्स तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. याचा सरकारने विचार करून प्रवेशाचे सोपस्कार सोपे करावेत.

कला ही आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असते. तिच्यावर कोणाचंच कसलंच बंधन असू नये या मताचा मी आहे. कोणत्याही कलेचं मूळ हे त्या लोकांच्या आणि त्यांच्या भाषा आणि संस्कृतीशी असलेल्या नात्यात असतं. त्यामुळे त्याचा गैरवापर करून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये. जर आपल्या कलेमुळे कोणा पिडीताचे प्रश्न सुटत असतील तर ही क्रांतिकारी गोष्ट ठरेल. आपण म्हणतो की साहित्य हे समाजाचा आरसा आहे. मला वाटतं की चित्रपटसुद्धा (लघुपट/माहितीपट किंवा व्यावसायिक चित्रपट) समाजाचा आरसा असले पाहिजे.¬ आजचे चित्रपट आपल्याला फक्त कल्पनाविश्वात रमवून ठेवतात. हे पाहून मी ठरवलंय, की मी पुढे जाऊन असे चित्रपट बनविण जे अर्थपूर्ण असतील.

हॉलीवूडमध्ये ज्या काल्पनिक विज्ञान कथांवर चित्रपट बनवले जातात ते तिथल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतून आलेले आहेत. त्या लोकांना नागरिक म्हणून आपल्या तुलनेत फार कमी समस्या आहेत. तिकडचे रस्ते चांगले आहेत, सर्वांना पुरेसं पाणी मिळतंय, सुरक्षा यंत्रणा चांगली काम करते, काहीही झालं तरी विमा असतो, वरून सरकार आणि प्रशासन पूर्ण मदत करते. त्यांनी विज्ञानात एवढी प्रगती केली आहे की त्यावरचे चित्रपट तिकडे जास्त येतात. समस्या असतील त्या नातेसंबंधात, त्यावरसुद्धा अमाप सिनेमे आहेत. (अपवाद सगळीकडेच असतात हे लक्षात घ्या.) आपल्याकडे सगळ्याच मूलभूत प्रश्नांची बोंब. यामुळे बॉलीवूडचं मला कौतुक वाटतं की कसं इतक्या सहजतेने ते इतके मुद्दे दुर्लक्षित करतात. ज्या समाजात आपण राहतो, त्याच समाजावर चित्रपट बनवायचे आणि त्यांचेच मूळ प्रश्न बाजूला ठेवून काल्पनिक कथा चित्रित करायला वेगळं टॅलेंट लागत असेल.

माझ्या वाचनामुळे मला हे काम करण्यात खूप मदत झाली. एक चित्रपट दिग्दर्शक होण्यासाठी तंत्रापेक्षाही सम्यक विचारांची गरज असते हे मला उमगलंय, जे की वाचन आणि अनुभवातून येतात. माझं असं मत आहे की प्रत्येकाने प्रायोगिक पातळीवर काम केल्यावर त्यात पुढे व्यावसायिक पद्धतीने काम करायला वेळ दवडू नये. म्हणून आता मी फिचर फिल्म्स बनवायचं ठरवलंय आणि त्यावर कामसुद्धा सुरु केलंय. 



(दैनिक सकाळवर हा लेख थोडक्यात वाचण्यासाठी या संकेतस्थळावर क्लिक करा - http://epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=http://124.30.219.86/EpaperData/Sakal/Mumbai/2019/05/25/Main/Sakal_Mumbai_2019_05_25_Main_DA_006/820_94_1906_800.jpg&uname= )

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.