Skip to main content

कुठे हरवली आहे संवेदनशीलता...


 “माणूस मारतो म्हणजे नेमकं काय होतं? तर लोक म्हणतात तो चेतनाहीन होतो. पण अविरत चेतना वागवत हिंडणारे, फिरणारे, खाणारे, पिणारे सारेच लोक खरंच जिवंत असतात...? खरं सांगायचं तर असं नसतं. वरवर जिवंत दिसणारे आपण खरंतर मेलेलो असतो. फक्त आपला अंत्यसंस्कार झालेला नसतो. पहिला मारतो विचार, मग मारते विचारधारा आणि त्यानंतर मारते संवेदना आणि मग अस्तित्वात येतं एक संवेदनाहीन जग. जे खरंतर एक स्मशानभूमीच असतं. या स्माशाणात आपल्याला कोणीही, कुठेही, कसंही ढकलत नेत असतं.” लोकशाहीर संभाजी भागात यांचे हे वाक्य मला आवर्जून सांगावेसे वाटतात.
 आपल्या देशात सध्या स्मशानभूमीसारखी परिस्थिती झाली आहे; म्हणजेच लोक संवेदनाहीन झाले आहेत. रोजच्या जगण्यात आणि रोजच्या वर्तमानपत्रात आपण अशा अनेक गोष्टी बघतो. असे अनेक उदाहरण सतत आपल्या समोर येत असतात. म्हणजे कुठे अतिरेकी किंवा बॉम्ब हल्ला झाला की जखमी लोकांना पाहून आपण म्हणतो की “बरं झालं हे आपल्या इथे नाही झालं ते...”; किंवा कोणी रस्त्यात एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर आपण दुर्लक्ष करून बाजूने निघून जातो; किंवा कुठे अपघात झाला तर लोक मदत करण्याऐवजी अपघातग्रस्तांचे फोटो काढत असतात. गेल्या महिन्यात दादरमध्ये एका दुकानाला आग लागली होती. तिथे बचावकार्यासाठी आलेल्या लोकांपेक्षा जास्त लोक फोटो काढणारे होते. काल रस्त्यात एका कुत्र्याला गाडीने धडक मारली. तो कुत्रा वेदनेने फार ओरडत, किंचाळत भुंकत होता. जमा झालेल्या लोकांमध्ये एक मुलगी पुढे जाऊन बघू लागली तर तिच्या सोबतचा मुलगा बोलला “काही नाही गं. जाऊदे, कुत्रा आहे तो.” या सर्व बारीकसारीक गोष्टींवरून कळतं की आपल्याला दुसर्‍यांच्या जीवाची किंमत कळत नाही. दुसऱ्यांच्या वेदना आपल्याला जाणवतसुद्धा नाहीत.
 एका शाळेत एक मुलगा दुसर्‍या मुलाला त्याच्या जातीवरून चिडवत होता. त्या दोघांचं खूप भांडण झालं आणि ते शिक्षिकेला समजलं. ती शिक्षिका म्हणाली, “आपण काय ब्राम्हण किंवा मराठा आहोत का... आपली जात कोणती - वैश्य वाणी, तर आपण आपलं काम करायचं...” या वाक्याचा असा अर्थ होतो की जातीभेद करण्यासाठी ब्राम्हण आणि मराठा जातीचे लोक आहेत, आपण त्यांच्या मध्ये नाही पडायचं. ती शिक्षिका त्या मुलाला अशी समजावून सांगू शकत होती की “जातीभेद करू नये. आपण सर्व माणसंच आहोत. जात-धर्म या गोष्टी रोजच्या जगण्यात नाही आणायच्या...” पण इथल्या समाजव्यवस्थेने ग्रासलेल्या लोकांकडून फार कमी चांगल्या गोष्टी घडतात. कारण त्यांना घरातूनच जातीपाती शिकवल्या जातात. माझा एक मित्र म्हणाला की त्याच्या घरी त्याचे आईवडील असं शिकवत होते की “महार, मातंग, चांभार या जातीच्या लोकांच्या घरी जायचं नाही. गेलास तरी काही खायचं प्यायचं नाही.” आता यावरून माणसांच्या जाणीवा प्रगल्भ होण्याऐवजी संकुचित होत चालल्या आहेत असंच दिसून येतं.
 १४ फेब्रुवारीला लोकांनी Valentine’s Day साजरा करू नये म्हणून काही सनातनी हिंदुत्ववादी संघटना उदा. शिवसेना, बजरंग दल, रणवीर सेना, अशा अनेक संघटनांनी या प्रेमाच्या दिवसाला विरोध करून हिंसा पसरवली. बाहेर दिसणाऱ्या जोडप्यांना धमकावण्यापासून ते मारहाणीपर्यंत सर्व हिंसा वापरली. कारण काय तर हिंदू संस्कृती बिघडते. ज्यांचे असे विचार आहेत, त्यांच्या काय जाणीवा, काय विचार, आणि काय संवेदनशीलता असेल हे कळून येते. प्रेम, दया, करुणा, विज्ञानवाद नष्ट करून क्रौर्य, हिंसा, मत्सर, भेद आणि अंधश्रद्धा पसरवणारे लोक काय संस्कृती जपतील हे एका संवेदनशील मनालाच कळेल. जिथे माणसं मारले जातात तिथे दुसरी तालिबान आणि अल-कायदा बनायला काय वेळ लागणार...
 अखंड भारतात मुस्लीमद्वेष पसरवणारे संघासारख्या संघटना प्रबळ होत आहेत आणि फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, भगतसिंग यांच्या देशात धर्मांधता वाढते आहे आणि ती सत्ता भोगत आहे यापेक्षा देशाला घातक गोष्ट काय... संत तुकोबा, संत चोखामेळा यांच्यापासून बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल असोत वा गांधीजी अथवा डॉ. नरेंद्र दाभोलकर असोत; किंवा काल-परवा झालेला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला असो. ही आक्रमणाची परंपरा अजून सुरूच आहे. देशाला बाहेरून आतंकवाद आणि आतून नक्षलवादाने पिडले आहे. देशातल्या माणसांना बाहेरून धर्मवाद आणि आतून जातीवादाने पिडले आहे. माणसातील मानसिकता बाहेरून वेदनाहीन आणि आतून संवेदनाहीन झाली आहे. देशातला युवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला सुभाषचंद्र बोस म्हणत आहे; आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कोण होते असे प्रश्न विचारत आहे. भांडवलवाद, त्याला संपवायला जन्माला आलेला साम्यवाद, पुरोगामित्व, क्रांती, शोषण, पिळवणूक, हे शब्दसुद्धा आजच्या कोलेजच्या तरुणांना माहीत नाहीत. आता प्रश्न इथपर्यंत पोहचला आहे की, “निषेध म्हणजे काय?”

- आशित

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…