Skip to main content

सारे मेले मुडदे

दोन दिवसापूर्वी खूप महिन्यांनी Shailesh भेटला होता. आम्ही दिवसभर म्हणजे जवळपास आठ तास असंख्य विषयांवर चर्चा केली, गप्पा मारल्या. दादरचा एक रस्ता सुटला नाही त्या दिवशी. ठिकठिकाणी "चल निघतो" असं म्हणत तासंतास तिथे उभे राहून बोलत होतो. बऱ्याच दिवसांनी कोणाशी तरी अनेक विषयांवर बोललो. मी रिचार्ज झालो. गप्पा मारताना आजू बाजूला असणाऱ्या गोष्टीचं चित्र नेणीवेत छापत गेलं आणि दोन दिवस सतत त्याची जाणीव होत होती; अनेक गोष्टी समोर येत गेल्या. त्यातूनच काहीतरी सुचलं, ते मांडतोय...
_______________________

लोकशाहीच्या देशात राहणारे आम्ही,
कळपात राहण्याची सवय गेली नाही,
रंगांच्या गर्दीत माथे फोडत बसलो,
पण माथ्यावरचं आभाळ दिसलंच नाही...

गाडीसारखी व्यवस्था,
त्याच्या चाकासारखे आपण,
विद्रोह करतो, पण
एकाच ठिकाणी गोल फिरत,
झिजत,
घासत...
त्या चाकांना जवळ यायचीसुद्धा सोय नाही...

गाडी घेऊन जाईल तिकडे
हे चाकांचे जत्थे जाऊ लागले आहेत.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाणारं जहाज
आपण बुडून बसलोय की काय,
काही कळतच नाही...

हेच चाक लोकशाहीचा गाडा घेऊन चाललेत,
पण गाडीचा चालक मात्र भलत्याच रस्त्यावर आहे.
त्या रस्त्यावर लोकशाहीला लुटायला अनेक टोलनाके आहेत,
जातीचे, धर्माचे, वर्णाचे, रंगाचे, वेदांचे, शास्त्रांचे नि शस्त्रांचे...
आणि चालकाला हे माहित असून
तो बेभान राँग टर्न मारत चालला आहे.

त्यांनीच दिलेले चष्मे घालून
अँटी-रिझर्वेशनिस्ट प्रेक्षक 3D नजारा बघत आहेत.
त्या चष्म्यातून रक्तबंबाळ झालेलं जग
ग्लॅमरसारखं चमकीप्रमाणे झगझगीत दिसतंय त्यांना...

या जगातून प्रेम, दया, करुणा, माणुसकी आणि विज्ञान
नष्ट करून
द्वेष, हिंसा, जातीयवाद, धर्मभेद, अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचार
अशा त्यांच्या पुरातन गोष्टी सर्वमान्य करण्यासाठी
त्यांचे साम्राज्यवादी, जातीयवादी, धर्मवादी, भांडवलवादी संघ
जोरात कामाला लागले आहेत...

आणि आपण मात्र आपल्या इतिहासातल्या शौर्याच्या
चक्रव्यूहात अजून मश्गुल आहोत,
समोरच्या क्रौर्याला उत्तर न देता
आपण फक्त पुरोगामी भाषणं ठोकत आहोत...

जो समाज इतिहास विसरतो,
तो इतिहास घडवू शकत नाही...
असं म्हणून आपण
आपल्याच पुढच्या पिढीला
मेंगळट आणि मरतुकडे बनवत आहोत.

या ब्रम्हांडाच्या वर्म होलमधून बाहेर निघून,
आपल्याला नव्या अंतराळात नवे तारे तयार करायचे आहेत,
ते ही स्वतःचं गुरुत्वाकर्षण न गमावता...
ब्लॅक होलमध्ये मंद झालेल्या वेळेला
पुन्हा सुरु करायचं आहे...
प्रकाशाच्या अफाट वेगाने पुन्हा प्रवास सुरु करायचा आहे...

जय भिम!

- आशित.

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…