Skip to main content

संस्कृतीचे मक्तेदार आणि आपली लोककला

 संस्कृती हा विषय म्हटलं तर खूप गुंतागुंतीचा आहे. आपण याला खूप सोप्या पद्ध्तानीने समजून घेऊ शकतो, पण जर हा विषय कठीण समजून राहिलं तर मग तो कळायलाही खूप कठीण आहे. खरं तर संस्कृती ही कलेमधून अधिक लवकर व सोप्या पद्धतीने रुजली जाते. त्याही अगोदर संस्कृतीला धर्माच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजवलं गेलं. आजही अनेक कला किंवा लोककला ह्या हिंदू संस्कृतीच्या मानल्या जातात आणि बऱ्याच आहेतही. पण लोक भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही एकच मानतात. त्यातल्या त्यात गम्मत अशी आहे, की हेच लोक जेव्हा भारतीय संस्कृती इतरांना (परदेशी लोकांना, ई) दाखवत असतात तेव्हा ते हिंदू परंपरा, मंदिर, कला यांसोबत बौद्ध लेण्या, ताज महाल, लाल किला, इत्यादी हेही दाखवतात. जर का तुमच्या म्हणण्यानुसार हिंदू संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती आहे, तर मग इतर धर्माला का मध्ये आणतात? हे मध्ये आणतात कारण, मुळातच आर्यांनी आणि ब्राह्मणांनी त्यांची संस्कृती ही भारतातील मूळ बहुजनांवर भेसळ करून लादली. म्हणून आपल्याला कळतच नाही की, आपली संस्कृती कोणती आणि परकी कोणती!
 मुळतः भारतीय संस्कृती ही चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांच्या विचारांची आहे. हेच विचार संत कबीर, संत चोखामेळा, संत तुकाराम, शिवाजी महाराज, जोतीबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी पुढे चालवले. म्हणजेच भारतीय संस्कृती ही पुरोगामी आहे. यात ढवळाढवळ कोण करतं, तर परकीय आणि प्रतिगामी शक्ती. हेच सगळं चुकीचं त्यांनी त्यांची कला, साहित्य आणि संस्कृती आपल्यावर लादून आपल्याला भुरळ पडली आणि दिशाहीन केलं. आपणसुद्धा ते 'आपलं' समजून आत्मसात करत गेलो. म्हणून तर इथल्या मूळच्या लोकांना विविध जातींमध्ये विभक्त केलं, त्यांना शूद्र ठरवण्यात आलं व त्यांच्या ज्ञानार्जन करण्यावर बंदी आणली, परत नालंदा विद्यापीठ जाळण्यात आलं, नाहीतर तेव्हाच त्यांची पोलखोल झाली असती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं शोधून काढलं खरं, पण "सनातनी" लोकांना ते मान्य नाही आणि "कट्टर" लोकांना तर ते माहीतच नाही. सगळे बाबासाहेबांचं नाव घेत राहिले, पण त्यांचे विचार, त्यांचे पुस्तकं आपण वाचलेच नाही. मग काय झालं, की घरात बुद्धभीमाचा फोटो येऊन अजून हिंदू परंपरा ही चालूच आहे. असं झालं कारण, की जुन्या रुढी परंपरा ही एक चिकटलेली संस्कृतीच असते, जी लवकर जात नाही.
 ह्या संस्कृतीने आपल्याला देवाची श्रद्धा, प्रेत आत्म्याची भीती, धर्माच्या बेड्या, पूजा आरती आणि  चंगळवादामध्ये गुंतवून टाकलं. आज आपणच काहीजण प्रस्थापितांची कला म्हणजे खूप दर्जेदार, आणि लोककला म्हणजे खेडवळ, तुच्छ समजतो. म्हणजे आपण स्वतःचं विसरून किंवा त्याकडे दुर्लक्ष्य करून दुसऱ्यांच्या कला, साहित्य आणि संस्कृतीला ग्रेट मानू लागलो. ते त्यांच्यासाठी उच्च दर्जाचं असेलही, पण मग आपण आपल्याच मातीतल्या कलेला टाकून द्यायचं का? उलट आपल्याला आपलीच कला वापरून आपली नवीन, आधुनिक अथवा पुरोगामी संस्कृती निर्माण करावी लागेल. ज्या पद्धतीने ब्राह्मणांनी पहिले संस्कृती, दुसरं साहित्य आणि तिसरी म्हणजे कला या सर्वांच्या चाव्या स्वतःजवळ चोरून ठेवल्या; त्याच पद्धतीने आपण आता त्याच आपल्या कला, साहित्य आणि संस्कृतीच्या चाव्या हातात घेतल्या पाहिजेत. गौतम बुद्धाप्रमाणे आपण लोकांना मानवतेचं तत्त्वज्ञान सांगितलं पाहिजे, शिवाजी महाराजांप्रमाणे आपण इतिहास घडवला पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे आपण खरा इतिहास लिहिला पाहिजे, अण्णाभाऊ साठेप्रमाणे आपण साहित्य निर्माण केलं पाहिजे. तेव्हा कुठे आपण आपल्याला आपल्या संस्कृतीची जाण होईल आणि ती इतरांनाही सांगू शकू.
 अनेक कलाकारांमध्ये कला ही अनुवंशिकरित्या आलेली दिसते. जास्तकरून ही गोष्ट महार, चांभार आणि मातंग या जातींमध्ये आढळते. ज्या वेळी वर्णाश्रम पद्धतीमुळे उच्चवर्णीय शुद्रांवर जो अन्याय करून त्यांना राबवायचे. ते सर्व लोक उच्चवर्णीयांची सेवा करून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकत्र येऊन आपलं जगणं, आपल्यावर होणारे अत्याचार, ई. गोष्टी आपल्या पहाडी आवाजात गायचे व आपणच बनवलेले वाद्य वाजवायचे. हीच दिनचर्या असल्यामुळे 'गायन' किंवा 'वादन' ही कला त्यांना व त्यांच्या घराण्याला अवगत झाली आणि पुढे त्यांची मुले किंवा पुढची पिढी ही गाऊ लागली. याच कारणामुळे आजला बरेच गायक, कलाकार दिसतात, जे ती कला बिलकुल शिकलेच नाही पण ते त्यांच्या क्षेत्रात पारंगत झाले आहेत. उदा:- शाहीर अण्णा भाऊ साठे, वामनदादा कर्डक, शाहीर विठ्ठल उमप व त्यांची मुले, आनंद व मिलिंद शिंदे, अजय व अतुल गोगावले, ई. हे सगळे कलाकार त्यांची कला कुठेच शिकले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी आपल्या क्षेत्रात इतरांना मागे टाकून आपली वाटचाल केली.
 ब्राह्मण्यावादी संस्कृती ही अलोपाथिक औषधांसारखी असते; त्याने तात्पुरता आराम मिळतो पण तेच सुख चिरकाल टिकत नाही. त्याच्यात असणाऱ्या केमिकलमुळे पुढे आपल्यालाच त्रास होतो. पण आपल्या मातीतली लोककला ही आयुर्वेदिक औषधाधासारखी आहे, की ज्याने कसलाच साईड इफेक्ट होत नाही आणि कोणताही आजार हा मुळातून निघून जातो. हे सुख चिरकाल टिकणारं असतं. आपली लोककला ही अशीच आहे. ती प्रबोधनासाठी आहे. त्याने अज्ञान दूर होतं. पुढे त्यात अध्यात्म आणि पारंपारिक धार्मिक गोष्टी आल्या, पण मुळतः ती प्रबोधनात्मक आहे. संतांनी जरी अध्यात्म स्वीकारलं असेल, तरी त्यांचा उद्देश हा प्रबोधनाचा होता. "लोक-कला' ही लोकांनीच लोकांसाठी तयार केली. त्यातल्या त्यात 'शाहिरी' हा माहितीने परिपूर्ण असलेला लोककलाप्रकार. "भारुड" हे सर्वप्रथम संत एकनाथ महाराजांनी सुरु केलं. भारुड म्हणजे बहुजनांसाठी त्यांच्यामध्ये रूढ झालेली कला. बहु आणि रूढ हा शब्द एकत्र होऊन "बहुरूढ" हा शब्द तयार झाला; आणि पुढे त्याचं भारुड झालं. अजून, पवाड म्हणजे स्तुती. हे लोककलाकार शूर पराक्रमी व्यक्तीचा वीररसाने भरलेला पवाडा रचू लागले; आणि तोच पुढे पोवाडा झाला. लावणी हा कलाप्रकार शेती करणाऱ्या स्त्रियांपासून सुरु झाला. ते त्यांचे आयुष्यातले अनुभव, दिवसभराचं काम लयबद्ध ओळींतून शेतात लावणी करताना गुडघाभर चिखलात उभ्या राहून काम करत करत व्यक्त करायच्या. अशा अनेक प्रकारच्या लोककला मूळच्या भारतातील बहुजनांनी निर्माण केल्या. आणि पुढे त्याच कला चोरून ब्राह्मणांनी त्यात स्वतःचं साहित्य घुसवून आपल्या संस्कृतीची वाट लावली; याचं मोठं उदाहरण म्हणजे आपण आजची "लावणी" बघतोच.
 ह्या सगळ्या चाललेल्या चुकीच्या गोष्टी बदलण्यासाठी क्रांतीची गरज आहे आणि ती फक्त सांस्कृतिक चळवळीनेच होईल. आता आपणच आपल्या कलेचे मक्तेदार बनलो पाहिजे. संस्कृतीच्या चाव्या हातात घेतल्या पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, की न्याय मागून मिळत नसेल तर तो हिसकावून घ्या. आता आपलं लुटलं गेलेलं सगळं आपण हिसकावून घेतलं पाहिजे.

- आशित साबळे.

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.