Skip to main content

जय महाराष्ट्र की, जय भीम !

 एक विचित्र अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी ज्या महान लोकांना मानतो, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, ज्यांनी ह्या समाजासाठी मोठं कार्य केलं, ज्यांनी जुन्या रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, जाती-व्यवस्था, गुलामगिरी, अशा अनेक गोष्टींविरोधात लढले; अशा महान लोकांचा मी आदर ठेऊन, स्वतःला पुरोगामी विचारांचा मानतो. बुद्ध-शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो. इतिहासातील सर्व जाती-अंताच्या चळवळीच्या महापुरुषांना, विशेषतः गौतम बुद्ध व महात्मा फुले यांना गुरु मानून ज्यांनी आपल्याला स्वतंत्र भारताची राज्यघटना देऊन या भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं, जे आयुष्यभर समाजातून जातींमुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढत राहिले, ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त करवून दिलं, दलित-शोषित-पिडीतांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचा व शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला, अशा महापुरुषाला अभिवादन करून, त्यांचं कार्य डोळ्यासमोर आणून मी व भारतातील करोडो लोक "जय भिम" बोलतो.
 माझ्या एका जवळच्या मित्राने त्याचे विचार माझ्यासमोर मांडले आणि मला धक्का बसला. तो चक्क असं म्हणाला की, "जय महाराष्ट्र" बोलल्यावर माझ्यासमोर मला महाराष्ट्र दिसतो आणि जय भिम बोलल्यावर मला जाती दिसतात... वरच्या परिच्छेदामध्ये मी मुद्दामहून त्या गोष्टी व ते शब्द नमूद केले कारण माझ्या मित्राचं वाक्य वाचून कदाचित सर्वांना परत वरचा परिच्छेद वाचावासा वाटेल. हे ऐकून दुखः झालं की, जो व्यक्ती काल पर्यंत मला माझ्या विचारांचा असल्याचं भासवत होता, त्याने त्याचे खरे विचार आज मला सांगितले. जय महाराष्ट्र बोलल्यावर ठीक आहे की त्याला महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्रापुरता भूभाग (किंवा त्याचा इतिहास व त्याची भाषा) आठवायचे असतील, पण "जय भिम"चा आणि 'त्या अर्थाने' जाती दिसायचा काय संबंध. ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य जाती संपवण्यासाठी घालवलं, त्याचच नाव घेताना तुम्हाला जाती कशा दिसतात? जाती लक्षात येण्याऐवजी जातीअंताचा लढा का तुम्हाला आठवत नाही? गांधी हे नाव दिसलं की सर्वांना सत्याग्रह आणि उपोषणं आठवतात, सावरकर हे नाव ऐकलं की तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा आठवते, नेहरू म्हटलं की भारताचा राजकीय इतिहास आठवतो, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर अर्थशास्त्र, भारतीय संविधान, उच्च-शिक्षण या गोष्टी येण्याऐवजी त्यांची जात आणि दलित लोकच का डोळ्यासमोर येतात? अण्णाभाऊ साठेंचं नाव ऐकलं की त्यांची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्यांची शाहिरी व कादंबऱ्या आठवण्याऐवजी ते मातंग समाजाचे होते हे का डोक्यात येतं? असं असेल तर गांधीचं नाव घेतल्यावर बनिया जात आठवली पाहिजे, सावरकर म्हटलं की कडवट हिंदुत्ववाद आठवला पाहिजे, नेहरू ऐकलं की तो काश्मिरी ब्राह्मण होता हे आठवलं पाहिजे. का असं होत नाही? ही भेदभावाची परिस्थिती आपल्या राजकारणी समाजाने बऱ्याच आधीपासून सर्वसामान्यांवर आणून ठेवली आहे आणि आता त्याचा परिणाम युवांवर होत आहे कारण तेही त्याच समाजात राहतात जिथे ही भेदभावाची परिस्थिती अस्तित्वात आहे; ज्याचं एक उदाहरण म्हणजे हा माझा अनुभव.
 जो व्यक्ती म्हणतो मी जाती मानत नाही, त्यालाच या शब्दाने जाती दिसतात! जे लोक म्हणतात की जातीभेद राहिला नाही त्यांनी समाजात वावरताना बारीक निरीक्षण करावं. प्रत्येकाचं बोलणं व त्याचा अर्थ शोधावा, मग कळेल की जाती-व्यवस्था अजूनही किती घट्ट बसून आहे.
 माझ्या मते, "जय भीम" हे विद्रोहाचं प्रतिक आहे. तिथे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाही तर सर्वच महामानवांना अभिवादन आहे. जातीअंताच्या लढ्याची प्रेरणा आहे, "उच्च शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचा संदेश आहे". "जय भीम" म्हणजे गौतम बुद्ध व आधुनिक बुद्धाचं तत्वज्ञान आहे. मी विद्रोह करायची भाषा बोललो म्हणजे ती हिंसा नव्हे तर आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या-शोषणाच्या विरोधात उठणे-लढणे; म्हणजे तो विद्रोह. "जय भीम" ऐकून जर का तुम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर डोळ्यासमोर आणून त्यांची जात पाहत असाल तर तुमच्या एवढं "महामुर्ख" ह्या जगात कोणी नाही. "जय महाराष्ट्र" जर महाराष्ट्राला डोळ्यासमोर आणत असेल तर "जय भीम"ने तर अखंड भारतात क्रांती केली आहे. त्यामुळे मी प्रांतवादात न पडता भारतीय आहे असं जाहीरपणे सांगतो, कारण मी जर "जय महाराष्ट्रात" अडकून राहिलो तर मला शहीद भगतसिंग दिसणार नाही, चंद्रशेखर आझाद, राजगुरू दिसणार नाहीत, बिरसा मुंडा दिसणार नाही, पेरियार रामास्वामी नायकर दिसणार नाहीत आणि इतर महाराष्ट्राबाहेरील महान लोक मला दिसणार नाहीत.
 आजचा आपला प्रश्न मुळात ही भेदभावाची प्रवृत्ती लोकांमधून काढणे हा आहे. भाषेचं संवर्धन तेव्हा करू जेव्हा आपण सामाताधिष्टीत समाज बनवू. किंवा हे काम ते करतील ज्यांना ह्या जातिभेदाचे चटके न बसल्यामुळे त्याची जाणीव नाही. आपल्याच संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे मी हा अनुभव लिहू शकलो आणि त्याच अधिकारामुळे कोणाला काय करायचं ते प्रत्येकावर सोपवतो. मी माझे विचार कोणावर थोपू शकत नाही की लादू शकत नाही, पण ह्या गोष्टी ज्याला लागू होतात त्या होण्याला ते नाकारू शकत नाही.

- आशित साबळे

Popular posts from this blog

"वाचाल तर वाचाल"

माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.

 आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. …

दलित म्हणजे कोण?

दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज …

कसले हे बौद्ध...

बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त…