धर्म ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जुडलेली आहे. यापासूनच आपण कोणत्या पद्धतीने जगायचं हे शिकतो. आपण लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीत अशा पद्धतीने घडलो आहोत की, आपण धर्माविषयी टीका करत नाहीत, पटत नसतील तरीही त्याच्या जुन्या रुढीपरंपरे विरुद्ध बोलत नाही. इथूनच आपली मानसिकता अशा पद्धतीने घडते की, 'जे चाललंय ते चालू द्या...' मग पुढे येणाऱ्या पिढ्यांवरही तेच संस्कार होतात आणि २१व्या शतकातही तीच परिस्थिती दिसते जी पूर्वी असायची. आज आपण पाहतो की, लोक बदलले नाहीत. धर्माच्या नावावर तंत्र, मंत्र, यज्ञ, हवन, जादूटोणा, ई. गोष्टी आजच्या आधुनिक काळात घडत आहेत. मुळात धर्म म्हणजे काय, तो कोणासाठी व कशासाठी असतो, धर्माचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही, किंवा असं म्हणता येईल की त्यांनी चुकीच्या अर्थाने धर्म हा आत्मसात केला. प्राचीन काळापासून घडत आलेल्या चुकीच्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत, कारण आपल्याला त्याची माहिती व पुरावे मिळाले आहेत की त्याचा मानवाशी काही एक संबंध नाही किंवा ते उपयोगी नाही. धर्म किती जुना वा प्राचीन असल्याने त्याची महानता ठरत...