(हा लेख दैनिक सकाळ साठी ५०० शब्दांत लिहिलेला, पण इथे तो माझे अनुभव सांगून अजून विस्तृत पद्धतीने लिहिला आहे.) लहानपणापासूनच चित्रपट बनवायची इच्छा होती, पण ह्या सर्व गोष्टी कश्या असतात हे मला माहित नव्हतं. मी सातवीत असतानाच नास्तिक झालो. त्यामुळे देवधर्म करण्याऐवजी मी वाचू लागलो. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. माझा देव या संकल्पनेवरचा विश्वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्न पडू लागले. याच कारणामुळे माझं वाचन कथा कादंबरी भोवती नसून वैचारिक आणि तत्वज्ञानाशी निगडीत पुस्तकात मला रस होता. मी सुरुवातीच्या काळात वाचलेल्या पुस्तकांपैकी दोन ठळकपणे आठवतात – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं “राम आणि कृष्णाचं गौडबंगाल” आणि शहीद भगत सिंह लिखित “मी नास्तिक का आहे?”. या दोन पुस्तकांमुळे माझे विचार अजून स्पष्ट झाले आणि मला खात्री झाली की माझा नास्तिक होण्याचा निर्णय योग्य होता. मी रुईया महाविद्यालयात बी.एम.एम. शिकत असताना मला काही असे मित्र मैत्रिणी भेटले ज्यांच्यामुळे माझ्या वाचनाचा वेग वाढला. महात्मा ज्योतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, ...