एक विचित्र अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी ज्या महान लोकांना मानतो, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, ज्यांनी ह्या समाजासाठी मोठं कार्य केलं, ज्यांनी जुन्या रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, जाती-व्यवस्था, गुलामगिरी, अशा अनेक गोष्टींविरोधात लढले; अशा महान लोकांचा मी आदर ठेऊन, स्वतःला पुरोगामी विचारांचा मानतो. बुद्ध-शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो. इतिहासातील सर्व जाती-अंताच्या चळवळीच्या महापुरुषांना, विशेषतः गौतम बुद्ध व महात्मा फुले यांना गुरु मानून ज्यांनी आपल्याला स्वतंत्र भारताची राज्यघटना देऊन या भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं, जे आयुष्यभर समाजातून जातींमुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढत राहिले, ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त करवून दिलं, दलित-शोषित-पिडीतांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचा व शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला, अशा महापुरुषाला अभिवादन करून, त्यांचं कार्य डोळ्यासमोर आणून मी व भारतातील करोडो लोक "जय भिम" बोलतो. माझ्या एका जवळच्या मित्राने त्याचे विचार माझ्यासमोर मांडले आणि मला ध...